वाहन चालकांपर्यंत नोटीसा पोहोचविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

0
 46 हजार 700 वाहनांच्या नोटीसा तयार
2 लाख 79 हजार वाहनचालकांनी मोडले नियम
पिंपरी चिंचवड :  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वाहतुकीचे नियम मोडून वाहने दामटणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी अडवून दंडाची पावती फाडण्यास नकार देत पोलीसांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकारातही भर पडली आहे. इतकेच काय तर पोलीसांनी गाडी अडविली तर ‘दादा’, ‘भाऊ’, ‘भाई’,ला फोन लावून गाडी सोडविण्याच्या घटना सातत्याने घडतात. त्यावर उपाय म्हणून वाहतुकीचे नियम मोडणार्‍या संबंधित वाहन चालकाला न थांबवता किंवा त्याच्याशी काहीही न बोलता वाहनाचा क्रमांक असलेल्या पाटीचे छाया चित्र काढण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार, गेल्या दहा महिन्यात नियम मोडणार्‍या दोन लाख 79 हजार वाहनांची माहिती वाहतूक पोलिसांनी गोळा केली आहे. त्यातील 46 हजार 700 वाहन चालकांना देण्याच्या नोटीसा तयार झाल्या आहेत. या नोटिसा वाहन चालकांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
मोबाईलमध्ये टिपले जातात क्रमांक…
आयुक्तांच्या आदेशानुसार चौकांमध्ये नियुक्तीस असलेले वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांच्या वाहनांचे क्रमांक त्यांच्याकडील मोबाईल कॅमेर्‍यात टिपतात. त्या वाहन क्रमांकावरुन त्या वाहन चालकाचे नाव, पत्ता शोधून काढला जातो. त्या नाव आणि पत्त्यावर दंडाची पावती घेऊन पोलीस घरी पोचतात. सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट जाणे, वेगाची मर्यादा न पाळणे, अनधिकृतरीतीने वाहने उभी करणे, पार्किंगच्या ठिकाणी वाहनांचे दुहेरी पार्किंग करणे, सीट बेल्ट न वापरणे, मोठयाने हॉर्न वाजवणे अशा विविध कारणांनी नियम मोडणार्‍या वाहनचालकांच्या वाहनाचे छायाचित्र घेऊन त्यांना दंड केला जात आहे.
ऑनलाईन दंड...
वाहतूक पोलिसांनी केलेला दंड न भरल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयात तसेच पारपत्र कार्यालयात गेल्यानंतर संबंधिताच्या दंडाची थकबाकी ऑनलाईन दिसते. त्यामुळे दंड भरल्याशिवाय वाहन चालकाचे तेथील काम होत नाही. वाहतुकीचे नियम मोडण्याची सवय झालेल्यांना आपण किती वेळा नियम मोडले याची माहिती नसते. नोटीस घरी आल्यानंतर दंडाचा आकडा पाहिल्यानंतर ही माहिती मिळते.
वाहतूक विभागाची कारवाई (1 जानेवारी ते 30 ऑक्टोबर 2018)
सांगवी- 61 हजार 269, हिंजवडी- 40 हजार 888, निगडी- 44 हजार 444, पिंपरी- 40 हजार 832, चिंचवड- 46 हजार 995, भोसरी- 38 हजार 987, चाकण- पाच हजार 347 (एकूण दंडाची रक्कम- चार कोटी 50 लाख)
कोट…
वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर कारवाई करताना वाहन चालक आणि वाहतूक पोलीस यांच्यामध्ये वाद होऊ नयेत, यासाठी वाहनांचे क्रमांक घेऊन कारवाईची नोटीस संबंधित वाहनचालकाच्या घरी पोहोचविण्यात येणार आहे.
– आर. के. पद्मनाभन, पोलीस आयुक्त, पिंपरी