पुणे । शहरात 2017मध्ये वाहन चोरीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामध्ये वाहन चोरीचे 3 हजार 169 गुन्हे दाखल झाले आहेत. तर खून चोरी, जबरी चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यात मात्र घट झाली आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यात वाढ तर बलात्काराच्या गुन्ह्यात किंचित घट झाली आहे.
फक्त 1,748 घटनाच उघडकीस
पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी 2016-17मधील गुन्ह्यांची तपशीलवार माहिती पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये 2017मध्ये 110 मर्डर त्यांपैकी 105 उघड, वाहनचोरीचे 3169, बलात्काराच्या 349 घटना घडल्या आहेत. 2016च्या तुलनेत बलात्काराच्या घटनेत किंचित घट झाली आहे. तर विनयभंगाच्या घटनांमध्ये मात्र वाढ झाली आहे. एकूण 699 विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. तर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 5466 चोरीच्या घटना घडल्या, त्यातील फक्त 1748 घटनाच उघडकीस आल्या आहेत.
सीसीटीव्हीची मदत
वाहतुकीचा नियमभंग केल्याप्रकारणी सीसीटीव्हीच्या आधारे 4 लाख 51 हजार 478 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 48 हजार 479 केसेसमधील 1 करोड 10 लाख 80 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या हद्दीत 1298 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या कॅमेर्यांच्या मदतीने 109 गुन्हे उघडकीस आले असून यातील 140 आरोपींना अटक करण्यात आले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सीसीटीव्हीमुळे वर्षभरात घरफोडी, चेन स्नॅचिंग, तोडफोडीचे 109 गुन्हे उघडकीस आले असून, 140 जणांना अटक करण्यात यश आले आहे.