बार्बाडोस । वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाचा देशातील आघाडीच्या क्रिकेटपटूसोबत पगाराच्या रकमेवरुन असलेल्या वादावर तात्पुरता तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे ख्रिस गेल आणि सुनील नारायणसारख्या अनुभवी खेळाडूंचा संघात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील काही वर्षांपासून विंडीजचे आघाडीचे खेळाडू आणि क्रिकेट वेस्टइंडिजमध्ये हा वाद सुरु होता. या वादामुळे 2014 मध्ये विंडीज संघाने भारत दौरा अर्ध्यावरच सोडला होता.
वेस्टइंडिजने स्थानिक क्रिकेट खेळणार्या क्रिकेटपटूंना संघात स्थान दिले होते. त्यामुळे अनेक दिग्गज क्रिकेटपटू संघाबाहेर गेले आणि वेगवेगळ्या टी-20 क्रिकेट लीगमध्ये खेळत असत. सीडब्ल्यूआयने दिलेल्या पत्रकानुसार वेतनासंदर्भात वाद मिटवण्यासाठी खेळाडू आणि बोर्डात एक करार करण्यात आला आहे. या करारातील मुद्दे सामायिक असल्यामुळे खेळाडू आणि बोर्डात चांगले संबंध निर्माण होतील.
विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचे आव्हान
वेस्टइंडिजचा संघ सध्या क्रमवारीत नवव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे 2019 मध्ये होणार्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. बोर्डाचे मुख्यकार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव्ह म्हणाले की, पात्रता फेरींच्या सामन्यावर आम्ही लक्श केंद्रित केले आहे. आगामी काळात आम्हाला इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध फक्त आठ एकदिवसीय सामने खेळायला मिळणार आहेत. त्यामुळे चांगले खेळाडू संघासाठी उपलब्ध करुन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल.