विकासकामांच्या निधीवरून गाजली अर्थसंकल्पीय सभा

0

यावलला विरोधक संतप्त ; सत्ताधार्‍यांची बोलती बंद

यावल:- पालिकेची अर्थसंकल्पीय सभा अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी गाजवली सत्ताधार्‍यांची बोलती बंद केली. 37 कोटी 87 लाख 93 हजार खर्च असलेला व तब्बल 32 लाख 31 हजारांची शिल्लकी अर्थसंकल्प सभागृहात मंगळवारी मंजूर करण्यात आला. पालिकेच्या सभागृतहात नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी पालिकेचा सन 2018-19 चा अर्थसंकल्प सादर केला. यात विविध विकासकामांवर करण्यात आलेल्या निधीच्या तरतुदीवर नगरसेेवक अतुल पाटील, गटनेता राकेश कोलते, डॉ. कुंदन फेगडे यांनी तीव्र अक्षेप घेतल्याने अर्थसंकल्पीय सभा चांगलीच गाजली. अर्थसंकल्प सादर करतांना नगरपालिका लेखा संहिता 1972 चे नियम 25 नुसार प्रपत्र 5 व 6 जोडले नाही म्हणुन हा धूळफेक करणारा अर्थसंकल्प आहे असे सांगत सत्ताधार्‍यांची बोेलती बंद केली.

सभेत सत्ताधारी धारेवर
मुख्याधिकारी यांनी प्रपत्रकानुसार कामाची यादी देण्याचे आवाहन केले तेव्हा अतुल पाटील, राकेश कोलते, डॉ. कुंदन फेगडे, देवयानी महाजन, रूख्माबाई भालेराव, पौर्णिमा फालक या विरोधी गटाकडून मुख्याधिकारींना अर्थ संकल्पात वर्ष भरात कोण – कोणती कामे घेतली जावी या करीता लेखी सुचना करीत त्या जिल्हाधिकारी कडून अर्थ संकल्पासोबत मंजूर करण्याचे सांगण्यात आले. व्यासपीठावर नगराध्यक्ष कोळी सह उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, मुख्याधिकारी सोेमनाथ आढाव तर अर्थ संकल्पाचे वाचन रमाकांत मोरे व खर्च तरतूद वाचन पंडीत सावकारे यांनी केले.

डॉ. कुंदन फेगडेंनी वेधले लक्ष
नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांनी येथील जलशुध्दी केंद्र दुरूस्ती करीता अर्थ संकल्पात तरतूद न केल्याचा प्रश्न उपस्थित केला कारण जलशुध्दी करण केंद्र दुरूस्ती कडे लक्ष वेधले व जर जलशुध्दी करण दुरूस्त केले नाही तर वर्ष भर नागरीकांना अशुध्द पाणी प्यावे लागेल, असे ते म्हणाले.