नवापूर । नगरपरिषद निवडणुकीनंतर 4 महिन्यांच्या कालावधीतच सत्ताधार्यांनी विकास कामांचा धडाका लावला. शहरातील विविध रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली. मागील वर्षात मंजूर झालेल्या विकास कामांचाही शुभारंभ झाला. एक-दोन नवीन नगरसेवकांनी आपणच कामे केल्याचा आव आणला. मात्र, आता राजकीय वरदहस्त असलेल्या ठेकेदारांची मुजोरी दिसायला लागली आहे. नगरपरिषदेचे अधिकारी विकास कामांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करत असल्याने ठेकेदारांचे फावते आहे.
नियमांकडे होतेय दुर्लक्ष
विकासकामे करताना शासकीय नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे. विकास कामांचे श्रेय घेण्यावरूनच ही रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. रस्त्यांची कामे होत आहेत, ही बाब चांगली असली तरी रस्त्याची कामे करताना दर्शनीय भागात विकास कामांबाबत संपूर्ण माहिती देणारे फलक लावण्याकडे दुर्लक्ष होत आहे. एका ही ठेकेदाराने नियमांचे पालन केलेले दिसत नाही.
कामांचा दर्जा सुमार
दोन वर्षांपूर्वी स्वस्तिक पेट्रोल पंपासमोर रस्त्याचे काम सुरु असताना दिशादर्शक फलक न लावल्याने अपघात होऊन एका दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला होता. तरीही आता पुन्हा तीच चूक होत आहे. मागील महिन्यातच एका ठेकेदाराला कामासाठी मुदतवाढ देऊनही तो कामात हलगर्जी पणा करत आहे. लोकशाही दिनाच्या माध्यमातून ठेकेदारावर दंडात्मक कारवाई झाली. ठेकेदारांकडून विकास कामांचा दर्जा राखला जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विकास कामांचा दर्जा उत्तम राखण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.