देहूरोड : सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात घुसून 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना विकासनगरातील प्रगती कॉलनीत सोमवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी नऊ हजार रुपयांची रोकड व 23 हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने असा ऐवज लांबविला आहे. याबाबत सीमा विलास इंगवले (वय 25, रा. विकासनगर, प्रगती कॉलनी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलीस तपास सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासनगरातील प्रगती कॉलनीतील रहिवासी सीमा इंगवले यांच्या सदनिकेत ही चोरी झाली. सोमवारी (दि. 11) रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास त्यांच्या सदनिकेचा बाहेरील दरवाजा उघडा होता. हीच संधी साधून या दरवाजातून दोन अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत त्यांच्या पर्समधील 9 हजार रुपये रोख आणि सोने-चांदीचे दागिने असा एकूण 31 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेनंतर इंगवले यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हवालदार श्याम शिंदे करीत आहेत.