विकासनगर भागात अनियमित पाणीपुरवठा

0

देहूरोड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या विकासनगर, दत्तनगर, किवळे, मामुर्डी भागात नागरी सुविधा पुरविण्यास पालिकेकडुन दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत. गेल्या आठ दिवसांपासून या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून पाणीपुरवठ्याच्या अनियमीत वेळांमुळे नागरिक पुरते वैतागले आहेत. पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांकडे अद्यापही पालिकेकडून हव्या त्या प्रमाणात नागरी सुविधा मिळत नसल्याचे चित्र कायम आहे.

आता पाण्यासाठी झळा
मागील आठवड्यातच कचरा वेळेवर उचलला जात नसल्याच्या कारणावरुन नगरसेविका प्रज्ञा खानोलकर आणि माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा टाकून आंदोलन करण्यात आले होते. यानंतर परिस्थिती सुधारण्याची आवश्यकता होती. मात्र, ही परिस्थिती जैसे थे असताना आता अनियमित पाणीपुरवठ्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गत आठवड्यापासून या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. आठवड्याच्या प्रारंभी दोन दिवस नळावाटे होणार्‍या गढुळ पाण्याच्या पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. तर मागील दोन दिवसांपासून अनियमित वेळेत पाणीपुरवठा सुरू असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. कामावर जायचे की पाणी भरण्यासाठी घरी थांबायचे,असा प्रश्‍न या नागरिकांना पडला आहे.

पालिकेकडून समाविष्ट भागाकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. एक आठवड्यापासून विकासनगर भागात अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. याबाबत पालिकेच्या संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करुनही त्यात सुधारणा होत नाही. उलट केलेल्या तक्रारीची साधी दखलही घेतली जात नाही. सकाळी नऊला होणारा पाणीपुरवठा आता दुपारी एक किंवा दोन वाजता होतो. पती-पत्नी नोकरीस असलेल्या कुटुंबांना पाणीच मिळत नसल्याची परिस्थिती ओढवली आहे.
-रोहित माळी, युवासेना