शिरपूर । शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील एका 20 वर्षीय युवकाने विक्रीसाठी आणलेल्या पाच तलवारी पोलिसांनी जप्त केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी 12 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.
पोलिसात गुन्हा दाखल
तालुक्यातील अहिल्यापूर येथील आर.सी. पटेल विद्यालयाच्या इमारतीच्यामागे झाडाझुडपात तलवारी लपविल्या असल्याची माहिती थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना मिळाली. त्यानुसार सपोनि. विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक जे.जी. महाले, पोहेकॉ. विजय जाधव, आर.के. शेख, नरेश गोपीचंद मंगळे, आर.एस. भदाणे, श्रीराज खाटीक, दावल सैदाणे, कृष्णा पावरा यांनी सदर इमारतीच्या मागील झाडाझुडपात लपविलेल्या पाच तलवारींसह ऋषिकेश उर्फ कमलेश रमणसिंग राजपूत (वय-20, रा. अहिल्यापूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1 मोबाईल देखील जप्त करण्यात आला. या कारवाईत पाच हजार रूपये किमतीच्या पाच तलवारी व 7 हजार रूपये किंमतीचा मोबाईल असा 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत विजय मछिंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋषिकेश राजपूत याच्यावर भारतीय हत्यार अधिनियम सन 1959 चे कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37(1)(3) चे उल्लंघन कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.