मुंबई: कॉंग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे. विखे पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित असून केवळ मुहूर्त बाकी आहे असे राज्याचे जलसंपदा मंत्री भाजपचे तारणहार गिरीश महाजन यांनी सांगितले. विखे पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय पाटील हे भाजपाच्या तिकिटावर निवडून आले आहे. कॉंग्रेसने डॉ. सुजय पाटील यांना तिकीट नाकारल्याने त्यान भाजपाने तिकीट दिले होते.
डॉ. सुजय पाटलांना तिकीट नाकारल्याने राधाकृष्ण विखे पाटील हे नाराज झाले होते. सुजय भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर विखे पाटील हे भाजपात प्रवेश करतील असे खुद्द सुजय पाटील यांनी पत्रकारांना सांगितले होते. त्यानुसार आज विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात भेट झाली. भेट झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी सांगितले कि, विखे पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून केवळ मुहूर्त बाकी आहे.
दरम्यान विखे पाटील यांचे राजकीय वजन वाढले आहे. भाजप प्रवेशानंतर त्यांना मंत्रीमंडळात मंत्रीपद दिले जाणार अशी चर्चा राजकीय क्षेत्रात वर्तवली जात आहे. गिरीश महाजन यांनी सांगितले कि कॉंग्रेस, राष्ट्रवादी या पक्षात कुणाला राहयची इच्छा नसून अनेक नेते भाजपा मध्ये प्रवेश करतील. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.