लोकसभेचे विरोधी पक्षनेते व राज्याचे काँग्रेस प्रभारी खर्गे यांची तंबी
मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्याचा प्रभार घेतल्यापासून काँग्रेसमध्ये चैतन्य आले असल्याचे वातावरण आहे. खर्गे यांनी सकारात्मक सुचनांसोबत मोठ्या नेत्यांना झापून काढायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील वादावरून देखील त्यांनी दोघांना तंबी दिली आहे. तुम्ही दोघेही राज्यातील मोठे नेते आहात. तुमचा वाद काँग्रेस पक्षाला मारक ठरतो आहे. त्यामुळे आपापसात बोलून तुमच्यातील वाद लवकरात लवकर निकाली काढा, अशी तंबी खर्गे यांनी विखे-पाटील व थोरात यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती देखील मिळाली आहे.
हे देखील वाचा

विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील व बाळासाहेब थोरात हे राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. मात्र या दोन्ही ‘नगरी’ नेत्यांचे हाडवैर राज्यभरात सर्वश्रुत आहे. एका पक्षात असूनही अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणापासून ते राज्याच्या राजकारणात ही जोडी कायम एकमेकांच्या विरोधातच कुरघोड्या करते, हे आजतागायत पहायला मिळाले आहे. बऱ्याच ज्येष्ठ व श्रेष्ठ नेत्यांनी या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन करण्याचा प्रयत्न केला पण आजपर्यंत त्याला अपयश आले आहे. आता नव्याने महाराष्ट्र प्रभारीपदी नियुक्त झालेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी या दोघांमध्ये सलोखा करण्याचा निश्चय केल्याचे समजते. त्याचाच एक भाग म्हणून आज खर्गे यांनी राधाकृष्ण विखे-पाटील व बाळासाहेब थोरात या दोघांबरोबर वांद्रे येथील एमसीए क्लब येथे सकाळी बैठक घेतल्याचे समजते. यावेळी त्यांनी दोघांनाही समजून सांगितले व त्यानंतर तंबीही दिल्याचे कळते. तुम्ही दोघे एकत्र आलात तर राज्यात काँग्रेसला खूप फायदा होईल त्यामुळे काँग्रेससाठी एक व्हा, असे खर्गे म्हणाल्याचे कळते.