लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे ; मामाजी टॉकीज भागात अमृत योजनेच्या कामाला प्रारंभ
भुसावळ:- अमृत योजनेचे काम पूर्ण होणार नाही, अशी अफवा उडवून विकासात अडथळा आणण्याचे पाप काही लोक करीत असून त्यांचे मनसुबे कदापी पूर्ण होणार नाहीत, अशा लोकांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची गरज असून शहर विकासाची घौडदौड नेहमीच सुरू राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत शहरातील उद्याने लवकरच कात टाकतील तसेच अमृत योजनेचे काम पूर्ण होवून आगामी 50 वर्षांचा पाणीप्रश्न सुटणार असल्याचा विश्वास नगराध्यक्ष रमण भोळे यांनी व्यक्त केला. शहरातील मामाजी टॉकीज भागात अमृत योजनेच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
11 जलकुंभ, 140 कोटींची योजना
नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, आगामी 50 वर्षांचा पाणीप्रश्न या योजनेच्या माध्यमातून सुटणार असून या योजनेसाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसेे व आमदार संजय सावकारे यांनी केलेला पाठपुरावा मोलाचा आहे. राज्यात सर्वप्रथम भुसावळात या योजनेचे काम होत असून 140 कोटींच्या या योजनेंतगर्र्त शहरातील विविध भागात 11 जलकुंभ उभारण्यात येतील. योजनेंतर्गत 70 किलोमीटर अंतराची पाईप लाईन वाढवण्यात येणार असून त्यासाठी आम्ही परवानगी घेत असल्याचे त्यांनी सांगत अमृतचे काम पूर्ण झाल्यानंतर ट्रीमिक्स पद्धत्तीने शहरातील रस्ते कात टाकतील त्यामुळे डांबरीकरणावर होणारा खर्चही वाचणार आहे.
शहरात 40 टक्के अवैध नळ कनेक्शन
अमृत योजनेच्या कामासाठी एचडीपीई दजाचे पाईप वापरले जातील त्यामुळे या पाईप लाईनवरील अनधिकृतरीत्या नळ कनेक्शन कुणालाही घेता येणार नाही मात्र कुणी तशी शक्कल लढवल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नगराध्यक्ष भोळे यांनी सांगत शहरात आजही 40 टक्के अवैध नळ कनेक्शन आहेत असून काही ठरावीक भागात तर 90 टक्के बोगस नळ कनेक्शन अवैध आहेत. दर वर्षापोटी येणारी 800 रुपयांची पाणीपट्टीदेखील काही लोक भरू शकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शहरातील उद्याने टाकणार कात
भुसावळातील पुलाच्या पलिकडे दोनच उद्याने असून त्यांचीही रया गेली आहे मात्र लवकरच ही उद्याने कात टाकणार असून शहरातील पलिकडच्या भागातही नवीन उद्यान साकारण्यात येणार असून लवकरच कामाला सुरुवात होईल, असे नगराध्यक्ष भोळे म्हणाले. आम्ही शहराचा विकास साधत असून काहींना मात्र पोटदुखीचा आजार जडला असून ते विकासात राजकारण आणत असल्याचे ते म्हणाले. आम्ही सत्तेवर आल्यानंतर अंधारात गडद झालेले रस्ते प्रकाशमान केले, अशुद्ध पाणीपुरवठा थांबवून शुद्ध पाणीपुरवठा केला, शहर स्वच्छतेसाठी जागो-जागी कचराकुंड्या ठेवल्या मात्र काही विघ्नसंतोषींना शहराचा विकास सहन होत नसल्याने त्यांनी कचरापेट्यांनाच आगी लावल्या तर जुना सातारे भागातील शौचालयांमध्ये मोठ-मोठी दगडे टाकून शौचालयांची नासधूस केली.
आम्ही एकसंघ, अफवा पसरवण्याचा काहींचा धंदा
शहरात विकासाची घौडदौड सुरू असताना काहींना ही बाब मान्य नसल्याने त्यांनी आमदार, नगरसेवक, नगराध्यांक्षामध्ये अफवा पसरवरून भानगडी लावण्याचा प्रकार सुरू केला असून त्यांचा तो धंदाच असल्याची टिका कुणाचेही नाव न घेता नगराध्यक्ष रमण भोळे यांनी केली. या बाबीने आम्ही विचलीत होणार नाही व शहराचा विकास आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूच राहील, असेही ते म्हणाले.
मामाजी टॉकीज रस्त्याने प्रत्येक नागरीकानेच घातल्या आम्हाला शिव्या -युवराज लोणारी
गेल्या आठ वर्षांपासून मामाजी टॉकीज रस्त्याचे काम रखडले असून 25 वर्षांच्या राजकारणात कुणी घातल्या नसतील इतक्या शिव्या लोकांनी आम्हाला घातल्याची स्पष्ट कबुली नगरसेवक युवराज लोणारी यांनी प्रास्ताविकात देत तत्कालीन नगराध्यक्षांनीच या रस्त्याचे काम होवू न दिल्याची टिका केली. कदाचित त्यांच्या भाऊंनी त्यांना काम करू द्यायचे नाही, असा दम भरला असेल, असे कुणाचेही नाव न घेता सांगत लोणारी म्हणाले की, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या भागातून गेलेल्या प्रत्येक वाहनधारकाच्या मणक्यात गॅप निर्माण झाल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली. ते म्हणाले की, अमृत योजनेचे काम या भागातून सुरू होत असल्याचा आनंद असून नागरीकांच्या प्रेमामुळेच या भागातून सातत्याने निवडून आलो आहे. योजनेच्या कामानंतर रस्त्याचे कामही मार्गी लागणार आहे. विरोधकांना शहरातील विकास दिसत नसल्याने त्यांच्या डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याची गरज असून कार्यक्रमाचे निमंत्रण देऊनही त्यांनी पाठ फिरवल्याची बाब दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.
मिरवणूक मार्गावर अंडरग्राऊंड वायरींग -आमदार सावकारे
कुठल्याही योजनेसाठी नियोजन महत्त्वाचे असते मात्र खड्डे जो पर्यंत खोदले जात नाही तो पर्यंत कामाला सुरुवात होत नाही, असा समज काहींचा असून अमृत योजनेच्या माध्यमातून 50 वर्षांचे नियोजन करण्यात आल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले. ते म्हणाले की, वीज कंपनीच्या अधिकार्यांसोबत काल बैठक झाली. त्यात भुसावळातील गणेशोत्सव मिरवणूक मार्गावरील सात किलोमीटरच्या परीघातील वीज वायरी अंडरग्राऊंड केल्या जाणार आहे. अमृत योजनेच्या कामासोबतच हे काम केले जाणार असून त्यासाठी संबंधित अधिकार्यांना प्रस्ताव पाठवण्यास सांगितले असून या कामाला आधीच मंजुरी मिळाली आहे. शहरवासीयांनी पाण्याचे महत्व ओळखावे, असे सांगून ते म्हणाले की, यंदा सर्वत्र बिकट स्थिती असून हतनूरमध्ये देखील साठा खालावला आहे. पाण्याचा अपव्यय टाळणे काळाची गरज असून जलबचत ही काळाची गरज असल्याचे आमदार म्हणाले.
व्यासपीठावर यांची उपस्थिती
उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, नगरसेविका सविता मकासरे, नगरसेवक प्रमोद नेमाडे, युवराज लोणारी, किरण कोलते, सीए दिनेश राठी, पिंटू कोठारी, महेंद्रसिंह ठाकूर, अमोल इंगळे, बापू महाजन, निक्की बत्रा, अॅड.बोधराज चौधरी, राजेंद्र नाटकर, मुकेश पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, वसंत पाटील, मुकेश गुंजाळ, गिरीश महाजन, देवा वाणी, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, परीक्षीत बर्हाटे, राजू सूर्यवंशी, किशोर पाटील, सतीश सपकाळे, रमेश मकासरे, उद्योजक मनोज बियाणी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नगरसेवक युवराज लोणारी यांनी तर पाणीपुरवठा सभापती राजेंद्र नाटकर यांनी आभार मानतात योजनेचे काम मामाजी टॉकीज परीसरातून सुरू केल्याने सर्वांचे आभार मानत काशीनाथ लॉजकडून येणार्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.