पुणे । माहितीपूर्ण संवाद मागे पडला आहे. वेगवेगळी मते असतानाही चर्चा करता येत असून राजकीय तसेच धोरणांच्या निर्मितीसंबंधात हा संवाद गरजेचा आहे. सर्वच राजकीय पक्षांची ही जबाबदारी आहे. परंतु सत्ताधार्यांनी त्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असून सध्या ते होत नाही. लोकशाही देशात आपल्या विचाराशी सुसंगत नसलेल्या गोष्टी फार्सिकल ठरवणे हे दुर्दैवी आहे, असे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते आणि लेखक तुहीन सिन्हा यांनी केले.
बाणेर येथे सुरू असलेल्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलच्या ‘द पॅलिकल लँडस्केप-बून ऑर बेन’ या चर्चासत्रात काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी, भाजपचे प्रवक्ते तुहीन सिन्हा, आ. नीलम गोर्हे, पत्रकार उदय माहुरकर यांनी आपली मते मांडली. ऋषी सुरी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर व्यक्त करण्यात आलेल्या प्रतिक्रिया नाटकी होत्या, असे म्हणत सिन्हा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. कर्नाटक सरकारने लंकेश यांच्या मारेकर्यांची माहिती देणार्याला १० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. ते बक्षीस राहुल यांना दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
नीलम गोर्हे म्हणाल्या, वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले अधिकाधिक लोक राजकारणात येत असून मतदानाची टक्केवारीही वाढत आहे. त्याबरोबर समाजमाध्यमांनाही आजच्या काळात महत्त्वाचे स्थान निर्माण झाले आहे. परंतु या माध्यमाचा वापर लक्ष देऊन व्हायला हवा. गावांमधील अगदी अशिक्षित महिलाही या चर्चा पाहात असून राजकीय घडामोडींविषयी त्यांच्यात जागरुकता आली असल्याचे दिसून येते. समाजमाध्यमे व त्यावर सुरू असलेल्या राजकीय वादविवादांपासून दूर राहणे शक्य नसून या चर्चेस सकारात्मक दिशेस घेऊन जाणे शक्य आहे, असे माहुरकर यांनी सांगितले.