विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम निर्विघ्न होणार

0

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी दिली ग्वाही

कोरेगाव भीमा : पेरणेफाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ स्थळी 1 जानेवारीला होणार्‍या अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. हा कार्यक्रम निर्विघ्नपणे शांततेत पार पडेल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला. गतवर्षीच्या कोरेगाव भीमा परिसरातील दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर येत्या एक जानेवारीला पेरणेफाटा येथे विजयस्तंभ स्थळी अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडावा, यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी शनिवारी सर्व खात्यांच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. तसेच तयारीचा आढावा घेत संबंधित विभागांच्या जबाबदार्‍यांबद्दल आवश्यक सुचनाही दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पखाले, संदीप जाधव, आदी उपस्थित होते.

जबाबदार्‍या पार पाडा

राम म्हणाले, 1 जानेवारीला होणारा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी व गेल्या वर्षी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी योग्य नियोजन करुन आपआपल्या जबाबदार्‍या व्यवस्थीत पार पाडाव्यात. या ठिकाणी संबंधित अधिकार्‍यांनी पार्किंगची व्यवस्था, अखंडीत वीज, शुद्ध पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी योग्य जागा उपलब्ध करुन द्यावी. आरोग्य विभाग, अग्निशमन दल, पोलीस विभाग यांनीही आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

अधिक बंदोबस्त व सुविधा

गेल्या दोन महिन्यांपासून बैठका घेत आहे. अभिवादनासाठी येणार्‍या सर्व बांधवांना सुविधा पुरवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. तर स्थानिकांनीही सकारात्मक वातावरणात पाणी व गुलाबपुष्पाने स्वागत करण्याची तयारी केल्याने कोणीच भिती बाळगू नये. तर एक जानेवारीला सुरक्षा विषयक कृती आराखडा बनवून नेहमीपेक्षा अनेकपट अधिक पोलीस बंदोबस्त तसेच दोन्ही बाजुला पार्कींग व अंतर्गत वाहतुक सुविधा देण्यात येणार आहे. तसेच जातीय द्वेष पसरविणार्‍या विघातक शक्तींना रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक काळजीही प्रशासनाकडून घेण्यात येत आहे, असे पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी यावेळी सांगितले.