पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार
पुणे : शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखो भीमसैनिक आले होते. मंगळवारी अतिशय शांततेत हा अभिवादन सोहळा पार पडला. बुधवारी पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुढाकार घेऊन विजयस्तंभ परिसराची स्वच्छता केली. डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सकाळी सात वाजता कोरेगाव भीमा येथे येऊन सरपंच रुपेश ठोंबरे यांची भेट घेतली. त्यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, कोरेगाव भीमाचे उपसरपंच शिवाजी वाळके, महिला समिती आयुक्त सुवर्णा चव्हाण व स्वच्छ संस्थेचे कर्मचारी यांना घेऊन परिसर चकाचक केला.
विजयस्तंभ अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय आल्याने विजयस्तंभावजवळ पुष्पचक्र, फुले आणि इतर साहित्याचा ढीग लागला होता. तसेच परिसरात पाण्याच्या बाटल्या, नाश्त्याच्या प्लेट्स, जेवणाच्या पत्रावळ्या असा कचरा पडला होता. नगर रस्त्यावरील लोणीकंद ते कोरेगाव भीमा हा परिसरही स्वच्छ करण्यात आला. डॉ. धेंडे यांनी स्थानिकांच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम राबविली.
ग्रामस्थांचे मानले आभार
विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी यंदा मोठी गर्दी झाली. प्रशासनाने अतिशय काटेकोर नियोजन केले होते. मात्र, गर्दीचा अंदाज न आल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडी वगळता अभिवादनाचा कार्यक्रम अतिशय शांततेत पार पडला. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो, असे डॉ. धेंडे यांनी यावेळी सांगितले.