पुणे । विज्ञान हे निसर्गाच्या नियमांचा शोध घेते तर अध्यात्म हे अंतरंगाचा ठाव घेते. या दृष्टिने पाहिले, तर विज्ञान आणि अध्यात्म यांच्या संगमातून आपल्याला संपूर्ण विश्वाचा धांडोळा घेता येतो, असे प्रतिपादन इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. जी. माधवन नायर यांनी व्यक्त केले. ‘डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ पुणेतर्फे आयोजित ‘विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती’ या विषयावर दोन दिवसीय जागतिक शिखर परिषदेचे उद्घाटन नायर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. मायकेल नोबेल, प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, प्रा. राहुल विश्वनाथ कराड, डॉ. स्टीफन मॉर्गन, डॉ. डेनिसी हफ्तालिन, उटाह टेक्नॉलॉजी कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. रिचर्ड आर. नेल्सन, आयसीसीआयडीडीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि डब्ल्यूएचओचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, डॉ. फिरोज अहमद बख्त, कुलगुरू डॉ.जय गोरे, प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील याप्रसंगी उपस्थित होत्या.
अध्यात्माची कास धरा
आज भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. अणुसंशोधन आणि अंतराळ विद्या या क्षेत्रामध्ये आपण अग्रभागी आहोत. हीच स्थिती इतरही क्षेत्रात आहे. आपण शहरी लोक सर्व प्रकारच्या सुविधा उपभोगत असतो. पण, खेड्यातल्या लोकांना चुळकाभर पाण्यासाठी मैलोन्मैल वणवण भटकावे लागते. हा विरोधाभास दूर करावयाचा असेल, तर आपल्याला अध्यात्माची कास धरावी लागेल, असे डॉ. जी. माधवन यांनी सांगितले.
संवाद कौशल्य महत्त्वाचे
विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी व संवाद कौशल्याने परिपूर्ण केले जाते. त्यामुळे या पद्धतीची जागतिक शांततेला निश्चितच मदत होईल, असे डॉ. स्टीफन मॉर्गन यांनी सांगितले. प्रा. राहुल कराड यांनी सांगितले की, आम्ही गेल्या 35 वर्षापासून विज्ञान आणि अध्यात्माच्या आधारे शिक्षण क्षेत्रात कार्य करीत आहोत. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
…तरच विश्व शांती नांदेल
भारतीय संस्कृती ही परंपरेशी जुळलेली असून येथे वसुधैव कुटुंबकम्ची परंपरा आहे. मानवकल्याण साधावयाचे असेल तर त्यासाठी मनाची व विचारांची शुद्धता व त्यानुसार आचरण आवश्यक आहे. विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयानेच विश्व शांती नांदेल, असे डॉ. विश्वनाथ कराड यांनी सांगितले.