विज्ञान युगात शिक्षीत समाज रूढी-परंपरांच्या जोखडातच

0

उद्योजक श्रीराम पाटील : मुक्ताईनगरात राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

मुक्ताईनगर- आजच्या विज्ञान युगातही शिक्षीत समाज हा समाजविघातक रुढी परंपरांच्या जोखडात अडकला आहे. समाज गुलामीच्या जोखडातून मुक्त होण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे साधन आहे. शिक्षणातून केवळ शिक्षित न बनता सुसंस्कृत व सुशिक्षित पिढी घडावी. एक वेळ मंदिरात गेले नाही तरी चालेल पण शाळेत जरूर जावे. कोणतेही यश सहज मिळत नाही त्यासाठी संघर्ष, जिद्द, चिकाटी गरजेची आहे, असे प्रतिपादन उद्योजक श्रीराम पाटील यांनी मुक्ताईनगर येथे केले. संत मुक्ताबाई महाविद्यालयातील संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित संत तुकाराम महाराज युवा फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे आयोजित राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळ्या प्रसंगी श्रीराम पाटील हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते .

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दर्जी फाऊंडेशनचे संचालक प्रा.गोपाल दर्जी, डीवायएसपी सुभाष नेवे, मुक्ताईनगर पंचायत समितीच्या सभापती शुभांगी भोलाने, मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा नजमा तडवी, प्रा.मनिषा देशमुख, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा परीषदेचे माजी गटनेते विनोद तराळ, जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष डॉ.अनिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिनेश कदम, फाउंडेशनचे सल्लागार एन.जी.शेजोळे, किशोर चौधरी फाउंडेशनचे अध्यक्ष छबिलदास पाटील, किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक संत तुकाराम महाराज युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष छबिलदास पाटील यांनी केले.

मोबाईल हा सोन्याचा खंजीरच
विविध क्षेत्रात समाजासाठी झटणार्‍या व समाजात योगदान हे आहेत बदल देणार्‍या गुणांचा गौरव होणे गरजेचे असते या माध्यमातून समाजात झटणार्‍यांना प्रेरणा देण्याचे काम फाउंडेशन करीत असल्याचेही अध्यक्ष छबिलदास पाटील यांनी सांगितले. डीवायएसपी सुभाष नेवे यांनी उपस्थितांना मोबाईल हा सोन्याचा खंजीर असल्याचा मोलाचा संदेश दिला तसेच सायबर क्राइम विषयक माहिती देऊन जागृत राहण्याचे सांगितले. त्यानंतर दर्जी फाऊंडेशनचे संचालक प्रा.गोपाल दर्जी म्हणाले ,जीवनात येणार्‍या संकटांना न घाबरता त्याचा मुकाबला करा यश तुमच्या हाती आहे, असे ते म्हणाले. प्रा.अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राज्यभरातील विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थींना शाल, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र ,पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.

यांनी घेतले परीश्रम
मुक्ताईनगर तालुक्यातील राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने शरद बोदडे, विनायक वाडेकर, संदीप जोगी यांना गौरविण्यात आले .तसेच दहावी व बारावीतील परीक्षेत यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष छबिलदास पाटील, उपाध्यक्ष सचिन पाटील, सुभाष पाटील ,भगवान दाभाडे ,आदेश कारले, आकाश शेजोळे, निरज बोराखडे ,प्रशांत वाघ ,विजू पाटील आदींनी परिश्रम घेतले .सूत्रसंचालन प्रा. पंकज पाटील (रावेर ) यांनी केले .तर आभार सचिन पाटील यांनी मानले.