पुणे । दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा येथील विठ्ठलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या यशोगाथेची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडिया आणि याचे फायदे या विषयावर देशभरात लाईव्ह व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली होती. या कॉन्फरन्साठी महाराष्ट्रच्या टीममध्ये विठ्ठलवाडी शाळेतील शिक्षक युवराज घोगरे यांना सहभागी होण्याची संधी मिळाली होती.
इतरही शाळांनी घेतली प्रेरणा
या कार्यक्रमानंतर मंत्रालयातील स्टुडिओमध्ये विठ्ठलवाडी शाळेची यशोगाधा सांगणारी क्लिप युवराज घोगरे यांच्या आवाजात चित्रीत करण्यात आली. या क्लिपमध्ये विठ्ठलवाडीतील गावकर्यांनी एकच ध्यास-विठ्ठलवाडी शाळेचा विकास या धेय्याने सर्वांनी प्रेरीत होऊन शाळेचा केलेला विकास, कष्टातून उभी केलेली शाळा, त्यातून पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त मिळविलेली बक्षिसे आणि यातून शाळेचा वाढलेला पट, जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाहण्याचा बदललेला दृष्टीकोण, या शाळेच्या उपक्रमांतून इतरही शाळांनी घेतलेली प्रेरणा यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या शाळेच्या या सक्सेस स्टोरीची क्लिप राज्यसरकारच्या वेबसाईटवर प्रसारीत केली जाणार आहे.
17 बक्षिसे मिळवण्याचा रेकॉर्ड
याच शाळेने तयार केलेला स्वच्छ भारत अभियानाचा लोगो संसदेमध्ये पंतप्रधानांच्या फोटोमध्ये प्रदर्शित झाला होता. केंद्रसरकारच्या ब्लॉगवर, तसेच राज्य सरकारच्या सहभाग महाराष्ट्राचा या पोर्टलवर या शाळेच्या स्वच्छ शाळेबद्दलचा लेख, व्हिडीओ, फोटो प्रदर्शित झाले होते. या उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले होते. या शाळेने गेल्या शैक्षणिक वर्षात पुणे जिल्ह्यात विविध स्पर्धेत सर्वात जास्त 17 बक्षिसे मिळवण्याचा रेकॉर्ड केला. आत्तापर्यंत या शाळेने लोकसहभागातून शाळेत अनेक भौतिक सुविधा उभारल्या आहेत.