पुणे । टाळ मृदंगाच्या गजरात रंगलेले कीर्तन आणि अभंग..भगव्या पताका घेऊन भक्तीरसात चिंब झालेले वारकरी…पालखीवर होणारी पुष्पवृष्टी…अखंड हरीनामाचा गजर…अशा भक्तीमय वातावरणात संत नामदेव महाराजांच्या पालखीचे पुण्यात आगमन झाले. यावेळी पालखीचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी महापौरांनी पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले.
संत नामदेव महाराज पालखी स्वागत समिती, पुणे शहर समाजाच्या वतीने पालखीचे स्वागत पुण्यात करण्यात आले. भवानी पेठेतील भवानी माता मंदिरासमोर सकाळी 7.30 वाजता पालखीचे आगमन झाले. त्यानंतर निवडुंग्या विठ्ठल मंदिरासमोर पालखी आल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी पुष्पहार घालून पालखीचे स्वागत केले. यावेळी नगरसेविका स्मिता वस्ते, पालखी स्वागत समितीचे मधुकर भूतकर, नामदेव समाजोन्नती परिषद, संदीप लचके उपस्थित होते. संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिक एकादशी निमित्त दरवर्षी पंढरपूर ते आळंदी पायी पालखीचे आयोजन करण्यात येते. पालखीचे यंदाही रांगोळ्याच्या पायघड्या, पुष्पवृष्टी आणि नगारावादन करून स्वागत करण्यात आले. भवानी माता मंदिर, निवडुंग्या विठ्ठल मंदिर आणि पुढे लक्ष्मी रस्त्यामार्गे पालखी आळंदीकडे रवाना झाली, असे संदीप लचके यांनी सांगितले.