विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ‘आयप्पा स्वामीं’चे आगमन

0

देहूरोड । मकरसंक्रातीनिमित्त मल्याळी बांधवांचे दैवत असलेले श्री आयप्पा स्वामी यांचा उत्सव सुरू झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्या स्वामींची मिरवणूक काढली जात असून शहर व परिसरातील विविध मंदीरांमध्ये पालखी व महापूजेचे आयोजन करण्यात येत आहे. शुक्रवारी विकासनगर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात स्वामींच्या पालखीचे आगमन झाले होते. या ठिकाणी महापूजा व भंडार्‍याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मल्याळी बांधव उपस्थित होते.पारंपारिक चर्मवाद्यांच्या साथीने सनईच्या सुरात श्री आयप्पा स्वामींची नगर प्रदक्षिणा तसेच मंदिरांच्या भेटीचा कार्यक्रम सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी विकासनगर येथील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात स्वामींचे आगमन झाले. नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले. पारंपारिक वेशभूषेत मल्याळी बांधव व महिला या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. 21 दीपांचे प्रज्वलन तसेच महापूजा करण्यात आली. फुलांची आरास करून मंडप सजविण्यात आला होता. आयप्पा स्वामी उत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

इंद्रायणीच्या घाटावर स्नान
विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचे विश्‍वस्त प्रकाश दांगट यांनी सर्व भाविकांचे स्वागत केले. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मकरसंक्रातीला येथील संस्था हिल टेकडीवरील आयप्पा मंदिरात उत्सवाचा प्रमुख कार्यक्रम होणार असून सायंकाळी मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संयोजकांनी दिली. संक्रातीच्या दुसर्‍या दिवशी देहु येथे इंद्रायणीच्या पवित्र घाटावर स्नान करून संत तुकाराम महाराजाच्या दर्शनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.

खर्‍या हत्तीच्या जागी छोटा हत्ती
वन्यप्राणी संरक्षण कायदा अंमलात आल्यामुळे येथील आयप्पा स्वामींच्या मिरवणुकीत सहभागी होणारी हत्तीची अंबारी गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी हा मान छोटा हत्ती म्हणून जाहिरातीत झळकलेल्या टाटा एस या वाहनाला मिळाला आहे. गेल्या काही वर्षांपासून या वाहनावरच ही मिरवणूक काढली जात आहे. विशेष म्हणजे हत्तीच्या पाठीवर लावण्यात येणारी अंबारी तसेच सोंडेवर लावला जाणारा सोनेरी साजही या वाहनावर लावण्यात येतो