जळगाव। प्रतिपंढरपूर’ समजल्या जाणार्या पिंप्राळा नगरीत विठ्ठल मंदिर संस्थान, वाणी पंच मंडळ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सव साजरा करण्यात आला. रथोत्सवाचे हे 142वे वर्षे असून मंगलमय वातावरणात हा उत्सव मोठ्या आनंदाने भक्तांनी साजरा केला. या निमित्त पिंप्राळ्यात विठ्ठल भक्तीचा मेळा फुलला. या रथोत्सवाची सुरुवात सकाळी 7 वाजता पंढरीनाथ विठ्ठलशेठ वाणी यांच्या हस्ते अभिषेक करून 11.30 वाजता महापूजा करण्यात आली. यंदा सुरेश मुरलीधर वाणी यांना महापूजेचा मान मिळाला आहे.
रथाला झेंडूच्या फुलांनी सजावण्यात आले होते. तसेच रथावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रथोत्सवासाठी यशस्वितेसाठी विठ्ठल मंदिर संस्थान कार्यकारिणीतील सदस्यांनी कामकाज पाहिले. यात अध्यक्ष मोहनदास वाणी, उपाध्यक्ष पंढरीनाथ वाणी, चिटणीस अशोक वाणी, सहचिटणीस प्रमोद वाणी, सदस्य संजय वाणी, योगेश वाणी, सुनील वाणी, रामदास वाणी यांचा समावेश आहे़.
रथाचे चाक हातावरुन गेल्याने एक जखमी
रथ मार्गक्रमण करीत असतांना रथाला मोगरी लावत असतांना रथाचे चाक हातावरुन गेल्याने पिंप्राळ्यातील रहिवाशी संदिप भिका पाटील (वय 28) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगीतले.
मान्यवरांच्या हस्ते आरती
भजनी मंडळ, टाळ व मृदंगाच्या गजरात अभंग, गवळणी व भजन करून राधा कृष्णाच्या मूर्ती 11.30 वाजता रथावर विराजमान झाल्यात. यानंतर महापूजा व त्यानंतर महाआरती करण्यात आली़ 12 वाजता सारथी अर्जून, हनुमान, गरूड मूर्ती व त्यापुढे घोडे आरूढ होवून रथ सुशोभित करण्यात आला होता. दुपारी 12 वाजता माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या हस्ते रथाची आरती करण्यात आली. याप्रसंगी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, नगरसेविका प्रतिभा कापसे, शोभा बारी, नगरसेवक अमर जैन, पिपल्स को-ऑप. बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मोगरी लावण्याची प्रथा
वाणी समाज पंच मंडळ व ग्रामस्थांतर्फे पांडुरंगाचा रथ जानकाबाई की जय’च्या जयघोषात रथोत्सवास प्रारंभ झाला. कुंभारवाडा, मढी चौक, कोळीवाडा, प्रशांत चौक, पिंप्राळ स्टॉप, गांधी चौकमार्गे यात्री 9ला आपल्या मूळ स्थानी रथ आला. रथाला मोगरी लावण्याचे मुख्य काम युवकांपासून ते वृद्धांनी मोठ्या जबाबदारीत पार पाडले. रथाचे मार्गक्रमण सुरळीतपणे पार पाडणार्या या मोगरीवाल्यांचा तिलक लावून वस्त्र, उपरण देऊन सत्कार करण्यात आला. रथाच्या अग्रभागी विठ्ठल मंदिराचे पुजारी श्याम शांताराम जोशी, भजनी मंडळाचे प्रमुख पुंडलीक महाराज आदी मंडळी होती.
रथाच्या अग्रभागी लेझीम पथकांनी सहभाग घेतला होता. यात पिंप्राळा येथील प्रयास मित्रमंडळ, विणकर हनुमान व्यायमशाळा यांच्या पथकाने भक्तांचे लक्ष वेधले होते. या लेझीम पथकात लहान मुलेदेखील सहभागी झाले होते. विठ्ठल नामाचा गजर करीत टाळ-मृदंगाच्या तालावर भक्तिभावाने निघालेल्या या रथाची ठिकठिकाणी पूजा करण्यात आली, तसेच पुष्पवृष्टीही करण्यात आली. रथोत्सवात पावसाने हजेरी लावल्याने भाविकांच्या उत्सहास उधाण आले होते. रथोत्सवात जनजागृतीपर फलक लावण्यात आले होते. यात श्रीरामाची मृर्ती ठेवण्यात आलेल्या वाहनास दारूच्या दुष्पपरीणामांची माहिती दाखविणारे फलक लावण्यात आले होते. यात लोकांचा विना हटवा, दारूला समाजातून हटवा असा संदशे देणार फलक लावण्यात आले.
सेल्फी काढण्यात तरूणाई गुंग
रथोत्सवानिमित्त पिंप्राळा स्टॉप चौकात यात्रा भरली होती. यात्रेत संसारउपयोगी वस्तू, खेळणी, सजावटीच्या वस्तू, फुगे यांची दुकाने थाटण्यात आली होती. दरम्यान, रथोत्सवाचे चित्रकीरण आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी युवकांची झुंबड उडाली होती. तर काही युवकांनी रथोत्सवाचे फोटो काढून सोशल साइटवर अपडेट केल्याने रथोत्सव प्रत्येकापर्यंत पोहचला. काही नागरिक छतावर चढुन रथाचे दर्शन घेत होते. रथ मढी चौंकात आल्यावर अर्धातास भाविकांच्या दर्शनासाठी उभा होता. तसेच पिंप्राळा स्टॉप येथे जवळपास 1 तास रथाचे दर्शन घेतले.