वित्त विभागाने पैसे न दिल्याने पोषण आहार बंद

0

महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची धक्कादायक माहिती
उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांचा सभात्याग

मुंबई : राज्याच्या वित्त विभागाने पुरेसे पैसे दिले नसल्याने मागील काही दिवसांपासून पोषण आहार बंद करण्यात आल्याची धक्कादायक माहिती महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. परंतु आता पुरवणी मागण्यांमध्ये ४०० कोटी रूपये मागण्यात आले. मात्र तरतूद करण्यात आली नसल्याचे सांगत ५२२ कोटी रूपये मार्च अखेर पर्यंत मिळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंडे यांच्या या उत्तराने समाधान न झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. याप्रकरणी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हस्तक्षेप करत याप्रश्नी अर्थमंत्र्यांशी बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना दिले.

दुकानदारानी उधारी केली बंद
विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील अंगणवाडीतील बालकांना आणि गर्भवती महिलांना पोषण आहार बंद करण्यात आल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. यावर मुंडे यांनी अंगणवाडीतील बालकांना आणि गर्भवती महिलांना पोषण आहार मिळावा यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून डाळ, तांदूळ, रवा, तेल आदी शिधा पुरवठा करण्यात येत होता. मात्र रक्कमच आली नसल्याने उधारीवर माल देणे दुकानदारांनी बंद केल्याने मागील आठ महिन्यापासून पोषण आहार बंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारमधील मंत्रीच कुपोषित
या उत्तराने विखे-पाटील यांचे समाधान न झाल्याने यासाठी तरतूद होणे अपेक्षित असतानाही तरतूद न होणे आवश्यक आहे. त्यामुळे पोषण आहाराबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत याबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला.त्यावर अर्थ विभागाकडून पैसा दिलेला नसल्याने पोषण आहार बंद करण्यात आल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा सांगत निधी आल्याशिवाय मी काहीही करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. निधीबाबत राज्य सरकारमधील मंत्रीच कुपोषित असल्याची टीका विखे-पाटील यांनी करत सरकारचा निषेध केला. तसेच सभात्याग केला. त्यानंतरही शेकापचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख, शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांनी प्रश्न उपस्थित करत जिल्हा विकास निधीतून कोणाची बिले भागविली असा सवाल करत पोषण आहाराची थकबाकीची आकडेवारी जाहीर करा अशी मागणीही केली.