विद्यापीठाचे रडगाणे सुरूच, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचे खच्चीकरण

0

मुंबई । उत्तरपत्रिकांचे ऑन लाइन मूल्यांकन करण्याच्या फंदात मुंबई विद्यापीठाने परीक्षांच्या निकालांचा बोर्‍या वाजवला आहे. परीक्षा होऊन 3 ते 4 महिने झाले तरी अद्याप विद्यापीठ परीक्षांचे निकाल जाहीर करत आहे. त्यामुळे आता मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय स्तरावरील असलेली प्रतिष्ठा पार धुळीस मिळाली आहे. विद्यापीठाने सर्व निकाल जाहीर करण्यासाठी 31 ऑगस्ट अशी तिसरी डेडलाइन ठरवून घेतली होती, मात्र त्याही वेळेआधी विद्यापीठ निकाल जाहीर करू शकले नाही. यामुळे आता विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होऊ लागले आहे. अनेक विद्यार्थी नैराश्येत जाऊ लागले असून ही बाब अधिक चिंतेची बनत चालली आहे. अद्याप 80 हजारांहून अधिक उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन बाकी आहे.

सदोष निकाल होतायेत जाहीर
आधीच मुंबई विद्यापीठाचे निकाल तुंबलेले आहेत. त्यामुळे विद्यापीठा काहीही करून निकाल जाहीर करण्याची शर्यत करत आहेत. त्यासाठी काही निकाल जाहीर झाले, मात्र त्यातही बर्‍याच चुका होत आहेत. तब्बल 90 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर लॉच्या विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला. मात्र त्यातही शेकडो विद्यार्थ्यांना नापास दाखवण्यात आले आहे. इतकेच नाही तर गेल्या सेमिस्टरमध्ये टॉपर असणार्‍या विद्यार्थिनीला गैरहजर दाखवण्यात आले. हे सर्व विद्यार्थी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे आहेत. 200 ते 250 विद्यार्थ्यांना परीक्षेला बसूनही गैरहजर दाखवण्यात आले आहे. तर अनेक विद्यार्थ्यांना नल अ‍ॅण्ड व्हॉईड असा निकाल आला आहे.

आता 6 सप्टेंबर नवी डेडलाइन
मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा निकालाची 31 ऑगस्टची डेडलाईनही टळली आहे. निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठाने आता 6 सप्टेंबर ही चौथी डेडलाईन दिली. पाऊस आणि गणपतीमुळे निकाल रखडले असा अजब दावा मुंबई विद्यापीठाकडून न्यायालयात करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या या निकालाबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. 31 ऑगस्ट ही विद्यापीठाकडून निकाल जाहीर करण्यासाठी डेडलाईन देण्यात आली होती. मात्र अखेरच्या दिवशी अजूनही 80 हजारांपेक्षा जास्त उत्तर पत्रिकांची तपासणी बाकी आहे. त्यामुळे विचित्र कारण देण्याची वेळ विद्यापीठावर आली.