विद्यापीठाच्या दोन समित्यांकडून जिल्हा रुग्णालयाची पाहणी

0

जळगाव। वैद्यकीय व दंत महाविद्यालयासोबतच पुढील वर्षी होमिओपॅथी व आयुर्वेद महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून पहिल्या वर्षी प्रत्येकी 100 जागांसाठी प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दोन समित्यांनी गुरुवारी जळगावात येऊन होमियोपॅथी व आयुर्वेद महाविद्यालय सुरू करण्यासाठी चिंचोली शिवारात जागेची तसेच जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल महाराष्टल आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे सादर केला जाणार आहे. होमिओपॅथी व आयुर्वेद महाविद्यालय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रत्येकी तीन जणांची समिती नेमली आहे. होमिओपॅथी समितीचे अध्यक्ष डॉ.अजय दहाड, सदस्य डॉ.एस.एस.थोरात व डॉ.सी.ई.लगड तर आयुर्वेद समितीचे अध्यक्ष डॉ.व्ही.पी.उखडकर, डॉ.डीमडीम व डॉ.मुगल आदी जणांची समिती गुरुवारी सकाळी जळगावात दाखल झाली. त्यांनी प्रथम जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील भामरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांची भेट घेऊन महाविद्यालय सुरू करण्याबाबत करावयाच्या उपाययोजनांबत चर्चा केली.

चिंचोली येथे केली जागेची पाहणी
जिल्हा रुग्णालयातून निघाल्यानंतर समितीन चिंचोली शिवारात जागेची पाहणी केली. तेथे जी.एम.फाउंडेशनचे अरविंद देशमुख यांनी त्यांना माहिती दिली. जळगावात महाविद्यालय सुरू करण्यायोग्य आहे का?, तेथे सुविधा उपलब्ध होऊ शकतात का? तसेच आयुर्वेद व होमिओपॅथी महाविद्यालयाची आवश्यकता आहे का? याबाबत पाहणी करुन कागदपत्रांची पडताळणी केली. या पाहणीचा अहवाल राज्य शासन व महाराष्टल आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (दिल्ली) यांची समिती जळगावात जागा व आवश्यक सुविधांची पाहणी करेल. दिल्लीच्या समितीचा अहवाल अंतिम असेल व तेच महाविद्यालयाला परवानगी देतील. ऑक्टोबरपर्यंत ही समिती जळगावात येणे अपेक्षित आहे.