विद्यापीठात विद्यार्थी तक्रारनिवारण कक्षाची स्थापना

0

सहा जणांचा करण्यात आला समावेश

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी हे या कक्षाचे अध्यक्ष असून, त्यांच्यासह सहा जणांचा त्यात समावेश आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 यामध्ये अशा प्रकारचा कक्ष विद्यापीठात तसेच, महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्थांमध्ये स्थापन करण्याची तरतूद आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी आणि त्या कमी करण्यासाठी नव्या अधिनियमात विविध मार्ग सुचविण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

अध्यक्ष व सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ

विद्यार्थी विकास मंडळातर्फे तसा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्याला कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी मान्यता दिली. त्यात अध्यक्ष डॉ. उमराणी यांच्यासह सदस्य म्हणून प्रा. दिनेश नाईक, प्रा. संजय खरात, डॉ. स्नेहल अग्निहोत्री, अनिल एकनाथ विखे यांचा समावेश आहे, तर सदस्य सचिव म्हणून विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई असणार आहेत. अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.नवीन विद्यापीठ अधिनियमानुसार, या कक्षाकडे विद्यापीठाबाबतच्या तक्रारी निर्देशित करण्यात येतील. त्याचबरोबर महाविद्यालयांच्या व मान्यताप्राप्त संस्थांच्या पातळीवर निर्णय न घेण्यात आलेल्या तक्रारीही या कक्षाकडे पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिली.