विद्यापीठ अनुदान आयोगाची जंकफुडवर बंदी

0

मुंबई (सीमा महांगडे) । राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील उपहारगृहांत विद्यार्थ्याना दिल्या जाणार्‍या जंकफूडवर बंदी घालण्याचे निर्देश द्यावेत, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने राज्यातील शासनाला दिले होते. मात्र, अद्याप शासनाकडून अद्याप कोणतेही निर्देश दिले नसल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत विचारलेल्या प्रश्‍नाला दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे महाविद्यालयाच्या उपाहारगृहातील जंकफूडला मोकळे रान मिळाले आहे.

राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांत चहा, कॉफीसोबतच पिझ्झा, बर्गर यांसारखे जंकफूडही उपहारगृहात विद्यार्थ्याना मिळते. मात्रा या जंकफूडचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या शरीरावर होत असलेला दिसून आला आहे. राज्याच्या सर्व अकृषी विद्यापीठांना हे निर्देश दिलेे होते. या कारणामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने 10 नोव्हेंबर 2016 रोजी राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयांना असे खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांना देण्यास बंदी घालण्याचे निर्देश द्यावेत, अशा सूचना केल्या होत्या. राज्याच्या सर्व अकृषी विद्यापीठांना आवश्यक कार्यवाहीसाठी हे निर्देश देण्यात आले होते. ज्या अन्नपदार्थांमध्ये कॅलरिजचे प्रमाण जास्त आणि न्युट्रीशनल व्हॅल्यू कमी असते अशा अन्नपदार्थांना जंकफूड संबोधले जाते. मात्र, अन्न व सुरक्षा कायदा, 2006 अंतर्गत जंकफूडची अशी कोणतीही व्याख्या नमूद नसल्याची माहिती तावडे यांनी आपल्या लेखी उत्तरात दिली आहे. यामुळे प्रामुख्याने जंकफूड म्हणून अशा कोणत्याही अन्नपदार्थावर बंदी घालण्याबाबत शासनाने कोणतेही आदेश निर्गमित केले नसल्याचे त्यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे.

विद्यार्थी संघटना आणि लोकप्रतिनिधींचा आग्रह
याचसोबत या जंकफूडवर निर्बंध घालण्यासाठी देण्यात आलेले निर्बंध रद्द करावेत यासाठी विद्यार्थी संघटनाचे प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी यांनी नोव्हेबर 2016 व जानेवारी 2017 मध्ये उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्याना निवेदन दिले नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जंकफूडवर घालण्यात आलेले निर्बंध रद्द करण्याबाबतचा प्रश्‍न राष्ट्रवादीचे नेते निरंजन डावखरे यानी विधानपरिषदेत विचारला असून, त्या संबंधित माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यानी आपल्या लेखी उत्तरात दिली.

नेहमीच सगळ्या विद्यार्थ्यांना घरातून डब्बा आणणे शक्य होत नाही. त्यामुळे दिवसभराच्या कार्यक्रमात महाविद्यालयात येऊन खाणे, हा एक पर्याय विद्यार्थ्यांसाठी असतो. त्यातही जंकफूड इतर खाद्यपदार्थांच्या मानाने स्वस्त आणि पोट भरणारे असल्याने बरेच जण तो पर्याय निवडतात. त्यामुळे त्यावर बंदी नकोच.
-प्रथमेश शिंदे, केईस कॉलेज.

जंकफूड प्रमाणात खाल्ले तर योग्य असते मात्र हल्ली त्याचे महाविद्यालयातील उपाहारगृहातील प्रमाण वाढले आहे. त्याच्या खाण्यातील जास्त प्रमाणामुळे खरोखरच शरीरावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सरकारने त्यावर बंदी नाही मात्र मर्यादा आणाव्यात.
-प्रेरणा कळंबे, रुईया कॉलेज.

जंकफूड कोणते किंवा साधे खाद्यपदार्थ कोणते यात खरच फरक केला जाऊ शकत नाही. त्यामुळे या किंवा त्या खाद्यपदार्थांवर अशी बंदी आणता येणार नाही. मुळात काय खावे आणि कोणत्या प्रमाणात खावे हे ज्याच्या त्याचवर अवलंबून असते. महाविद्यालयात नाही तर बाहेर जाऊन विद्यार्थी ते खाणारच.
-राजेश भालेकर, सराफ कॉलेज.

महाविद्यालयातील जंकफूडवर बंदी आणून हवा तसा उपयोग होणार नाही. उलट महाविद्यालयांत खाण्याऐवजी विद्यार्थी बाहेरचे खाद्यपदार्थ खातील. ज्याचा कदाचित आणखी वाईट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो.
-वीणा पोटे, एसएनडीटी कॉलेज.