पुणे : सावित्रीबाईफुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय आरोग्य शास्त्र विभागामधील शैक्षणिक गुणवत्ता व संशोधनपर उपक्रमांची दखल देत केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने ‘आयुष सेंटर ऑफ एक्सेलन्स’चा दर्जा बहाल केला. तसेच साडेतीन कोटी रुपयांचे अनुदानही जाहीर केले असल्याची माहिती कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर व डॉ. भूषण पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम संशोधन संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांच्या माध्यमातून आयुर्वेद योग, निसगौपचार, युनानी, सिद्धा आदी भारतीय वैद्यक पद्धतींशी संबंधित संशोधनाला चालना मिळणार आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजांरावर भारतीय वैद्यक पद्धतीच्या माध्यमातून उपचार पद्धतीचे प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे, डॉ. पटवर्धन यांनी सांगितले. आयुष सेंटरच्या माध्यमातून प्रायोगिक प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील सिरम इन्स्टिट्युट, आयसर, राष्ट्रीय पेशीविज्ञान केंद्र, मनिपाल कॅन्सर इन्स्टिट्युट आदी नामवंत संस्था संशोधन संस्थांमधील तज्ज्ञ यामध्ये सहभागी होणार आहेत.