जळगाव। विद्यापीठ कायदा 2016 नुसार उमविच्या अधिसभेवर व्यवस्थापन प्रतिनिधींमधून सहा आणि प्राचार्यांमधून दहा जागा निवडून देण्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.ए.बी.चौधरी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहिर केला. प्राचार्य आणि व्यवस्थापन प्रतिनिधी यांची प्राथमिक मतदार यादी जाहिर करण्यात आली आहे. यादीतील नावांमधील बदल अथवा आक्षेप नोंदविण्यासाठी 31 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
10 ऑगस्टला अंतिम यादी
या सुधारित यादीवर 7 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत कुलगुरुंकडे अपिल करता येईल. 9 ऑगस्ट रोजी कुलगुरु या अपिलावर निर्णय देतील. 10 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. तर 16 ऑगस्ट रोजी निवडणूक सूचना प्रसिध्द होईल. 24 आणि 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करता येतील. अर्जांची छाननी होवून वैध-अवैध अर्जांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि नोटीस बोर्डावर प्रसिध्द होणार आहे.
संकेतस्थळावर अधिसुचना
28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून 31 ऑगस्ट रोजी निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी घोषित होणार आहे. 17 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. 19 सप्टेंबर रोजी निकाल जाहिर होईल. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. अशी माहिती प्रा.ए.बी.चौधरी यांनी दिली.