विद्यापीठ प्राधिकार निवडणुकीसाठी नवीन पदवीधर नोंदणी करावी

0

जळगाव । शासनाने नवीन विद्यापीठ कायदा 2016 मध्ये लागु केला. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठातील विविध प्राधिकारणाची निवडणुक घेण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधरांची दहा जागेसाठी निवडणूक होणार आहे. नवीन विद्यापीठ कायद्या निवडणूक घेतली जाणार असल्याने 2016 मध्ये नवीन पदवीधर नोंदणी केलेल्या पदवीधरांनाच निवडणूकीत सहभाग घेण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अ‍ॅड.जमील देशपांडे यांनी केली. 2015 पूर्वी नोंदणी केलेल्या पदवीधरांना निवडणूकीत सहभागी करु नये अशी मागणी करत त्यांनी याबाबत लेखी पुरावा मागितला. त्यांनी केली. प्राधिकरण निवडणूक संदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवार 29 रोजी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या उपस्थितीत पदवीधरांच्या माजी प्रतिनिधी तसेच पदवीधर गटातून निवडणूक लढवू इच्छिणार्‍या विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक विद्यापीठात घेण्यात आली.

निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे शैक्षणिक संस्था असून या ठिकाणी होणार्‍या निवडणुका ह्या बिनविरोध व्हावे यासाठी सर्व राजकीय पक्षाने प्रयत्न करावे तसेच विद्यार्थी हित जोपासून निवडणूक बिनविरोध कराव्यात असे आवाहन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना केले. विद्यापीठ प्रशासन बिनविरोध निवडणूका पार पडाव्या यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे.

या विषयांवर झाली चर्चा
बैठकीत उपस्थित असलेल्यांनी चर्चेत सहभाग घेऊन काही सुचना केल्या. बैठकीत निवडणूक व पदवीधर नाव नोंदणी, महाराष्ट्रातील इतर विद्यापीठात नोंदणी शुल्क घेतले जात नाही उमवीतही ते घेऊ नये, अंतराच्या दृष्टीने मतदान केंद्र ठेवावे, विवाहित महिलांच्या नावात बदल झाला असेल तर त्यांनी दिलेले डिक्लेरेशन ग्राहय धरण्यात यावे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
बैठकीच्या प्रारंभी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर निवडणूक शाखेचे विभागप्रमुख तथा उपकुलसचिव बी.बी.पाटील यांनी या निवडणूक प्रक्रियेची तसेच परिनियमांची माहिती दिली. दाऊदी हुसेन, दिलीप रामू पाटील, अतुल कदमबांडे, अ‍ॅड.जमिल देशपांडे, नितीन ठाकूर, विष्णू भंगाळे, योगेश मुकुंदे, पी.एस.पाटील, अ‍ॅड.अमित दुसाने आदींनी चर्चेत सहभाग घेतला. सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील यांनी केले. उपकुलसचिव बी.बी.पाटील यांनी आभार मानले.