भोपाल- शैक्षणिक समुपदेशनाच्या एका कार्यक्रमानिमित्त मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान एका ठिकाणी गेले होते. एका शैक्षणिक कार्यक्रमात विद्यार्थ्याकडून आरक्षणासारख्या विषयावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो याची कल्पनाही कदाचित चौहान यांनी केली नसेल. मात्र एका विद्यार्थ्याने त्यांना आरक्षणावर प्रश्न केला. या विद्यार्थाने केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री अक्षरशः गोची झाली.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान समुपदेश करीत असतांना आरक्षणावर बोलत होते. हे ऐकून एक विद्यार्थी उभा राहिला व बोलू लागला मामाजी, कृपया शिक्षणात जात आणू नका. माझ्या मित्राला तो आरक्षित वर्गातून येत असल्यामुळे लॅपटॉप देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मला त्याच्यापेक्षा ३ टक्के जास्त आहे. पण मला तो लॅपटॉप मिळू शकलेला नाही, असा प्रश्न विद्यार्थ्याने केल्याने मुख्यमंत्री निशब्द झाले.
सर्वांना समान वागणूक द्या
अचानक आलेल्या या प्रश्नामुळे चौहान काहीवेळ गडबडले. त्यांनी काही वेळ घेतला. पण तो विद्यार्थी सातत्याने ‘मामाजी कास्ट (जात), मामाजी कास्ट’ असे म्हणत होता. ८० टक्के मिळूनही मला लॅपटॉप का मिळत नाही, असा सवाल तो करत होता. अडचणीत आणणारा प्रश्न आल्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांनी त्या मुलाला रोखण्याचा प्रयत्न केला. पण तो विद्यार्थी सातत्याने सर्वांना समान वागणूक द्या, असे सांगत होता. त्याला उपस्थित विद्यार्थ्यांनीही साथ दिली. दरम्यान, चौहान यांनी अधिकाऱ्यांना शांत करून उत्तर देण्यासाठी काही वेळ घेतला.
खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना लाभ का नाही मिळत
अनेक वर्षांपासून मागे राहिलेल्या लोकांसाठी आपण काही केले किंवा त्यांना काही सवलती दिल्या तर याबाबत तक्रारी करू नयेत. आपला देश विविध रंगांच्या फुलांचा आहे. या प्रत्येकाची काळजी घेणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. मोठ्या मनाने प्रत्येकाने हे केले पाहिजे. अशावेळी विद्यार्थ्यांनी वेगळ्या योजनेचा लाभ घ्यावा, असे उत्तर त्यांनी त्या विद्यार्थ्याला दिला. यावेळी आणखी एका विद्यार्थ्याने हा मुद्दा उपस्थित केला. फक्त आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांनाच लॅपटॉप किंवा इतर सवलती दिल्या जातात. खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ का मिळत नाही, असा सवाल त्याने केला.