तळेगाव (प्रतिनिधी) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने निर्भय कन्या अभियानांतर्गत नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनींसाठी नुकतेच निर्भया पथक विशेष मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. नूतन महाराष्ट्र विद्या पॉलिटेक्निक कॉलेज येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देहूरोड विभागीय शाखेचे डीवायएसपी गणपतराव माडगूळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव सोनवणे, महिंद्रा अँड महिंद्राचे संदीप पानसरे, संस्थेचे विश्वस्त रामदास काकडे, सदस्य सोनबा गोपाळे गुरुजी, प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे, कार्यक्रम अधिकारी जावेद शेख आदी याप्रसंगी उपस्थित होते.
सतर्क रहा
विद्यार्थीनींच्या अनेक शंकांचे निरसन करताना गणपतराव माडगूळकर यांनी स्वसंरक्षण कसे करावे, तक्रार कशी करावी, प्रतिरोध करताना काय करावे आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. बसमध्ये, ट्रेनमध्ये प्रवास करताना विद्यार्थीनींनी सतर्कता ठेवावी, तसेच स्नेहसंबंध ठेवताना तारतम्य बाळगावे, असा कानमंत्रही त्यांनी दिला.
सोनवणे यांनी देखील विशाखा समिती, सखी सदस्य, निर्भया पेटी, दामिनी पथक आदी सरकारी महिला संरक्षण उपक्रमांची माहिती दिली. रामदास काकडे यांनी ’ज्ञान मिळवा, संपत्ती मिळवण्यासाठी पात्र व्हा आणि त्याचबरोबर व्यायाम करून सक्षम बना’ असा महत्वपूर्ण सल्ला विद्यार्थीनींना दिला. शुभांगी कुंभार यांनी हेल्पलाईन क्रमांक देऊन विद्यार्थीनींना मदत करण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम असल्याचे सूचित केले. या शिबिराचे सूत्रसंचालन प्रियांका बर्डे यांनी केले तर प्राचार्य डॉ. कानफाडे यांनी आभार मानले.