जळगाव । घरात रात्री झालेले असतांना विद्यार्थ्यांच्या खोलीतून अज्ञात चोरट्यांनी एक लॅपटॉप व दोन मोबाईल असे 46 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. ही घटना भगीरथ कॉलनीत येथे घडली आहे. रविवारी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी जिल्हा पेठ पोलिस स्टेशन गाठत घडलेला प्रकार सांगून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी अज्ञात चोरट्यांविरूध्द जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी दरवाजा उघडा असल्याची साधली संधी
कौस्तुभ किशोर पाटील (वय 24 रा.आमडदे, ता.भडगाव,ह.मु.भगीरथ कॉलनी, जळगाव) हा बांभोरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. भगीरथ कॉलनीत ज्ञानेश्वर नथ्थू पाटील यांच्या घरात चार मित्र भाड्याने राहतात. 18 ऑगस्ट रोजी महाविद्यालयातून आल्यानंतर कौस्तुभ याने लॅपटॉप कपाटात ठेवला तर मोबाईल टेबलावर ठेऊन झोपून गेला. यावेळी त्याचा मित्र योगेश संजय निकम हा देखील रात्री साडे दहा वाजता झोपला, मात्र झोपताना दरवाजा बंद करण्याचा त्याला विसर पडला. सकाळी उठल्यावर कौस्तुभ याला टेबलावरील मोबाईल गायब झालेला दिसला. त्याने मित्र योगेशला मोबाईलबाबत विचारले असता त्याचाही मोबाईल गायब झालेला दिसला. कपाटातील लॅपटॉप पाहिला असता तोही नव्हता. घरात चोरी झाल्याची खात्री पटली. रात्री झोपताना दरवाजा बंद करण्याचा विसर पडल्यामुळे चोरट्यांना मोबाईल व लॅपटॉपवर सहज हात मारता आला. दरम्यान, कौस्तुभ याने रविवारी जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून चोरट्यांचा शोध घेत आहेत.