पुणे । सावित्रीबाई फुुले पुणे विद्यापीठातील महाविद्यालयांमध्ये यंदाच्या वर्षीही गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र पुढील शैक्षणिक वर्षापासून निवडणुकांद्वारे विद्यार्थी प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे.नवीन विद्यापीठ कायद्याच्या तरतुदीनुसार यंदा सर्व महाविद्यालयांमध्ये निवडणुकीद्वारे विद्यार्थी निवडणे अपेक्षित होते. मात्र विद्यार्थी निवडणुका यंदाच्या वर्षी घेणे शक्य नसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले.
त्यामुळे यंदा विद्यार्थी प्रतिनिधी निवड दरवर्षीप्रमाणे गुणवत्तेच्या आधारे निवडले जावे, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाने सर्व महाविद्यालयांना परिपत्रक पाठविले आहे. गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थी प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. त्या विद्यार्थ्यांमधून विद्यार्थी परिषदेचा सचिव 4 जानेवारी 2018 रोजी निवडला जावा. त्याची माहिती विद्यार्थी विकास मंडळाच्या पोर्टलवर ऑनलाइन पध्दतीने नोंदविण्यात यावी, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय छात्र सेनेचा प्रभारी अध्यापक, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक हे विद्यार्थी परिषदेचे सदस्य असतील. या निवडीची माहिती 8 जानेवारीपर्यंत विद्यार्थी विकास मंडळाच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदवायची आहे, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.