विद्यार्थी बेपत्ता होण्याने पालकांमध्ये वाढली चिंता ; बालगुन्ह्यात वाढ

0

नंदुरबार (रविंद्र चव्हाण) । शहरातील शाळकरी मुलं म्हणजे विद्यार्थी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जातेय. अपहरण झालेल्या डी आर हायस्कुलचा विद्यार्थी राज ठाकरे याचा निघृणपणे खून करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतांना श्रॉफ हायस्कुलमधील इयत्ता आठवीतील विद्यार्थी 12 जुलै रोजी बेपत्ता झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये कमालीची भिती व्यक्त होवू लागली आहे. पैशांसाठी मित्रांनीच विद्यार्थ्याची गळा चिरून केलेली हत्या अन् विद्यार्थी- विद्यार्थीनीचे करण्यात आलेले अपहरण य सार्‍या घटना सुन्न करणार्‍या असून नंदुरबार शहरासाठी हा सामाजिक प्रश्‍न बनुन उभा राहिला आहे.

कायद्याचा धाक नाही
नंदुरबार शहरात कायद्याचा धाक राहीला नसल्याने बाल गुन्हेगारांचे प्रमाण वरडोकं काढू लागलय. चोरी चपाटी करून शालेय जीवनात एन्जॉय करणे अशी प्रकृती अपवाद वगळता काही अल्पवयीन विद्यार्थ्यांची बनली आहे.अशा प्रकृतींमुळेच विकृती वाढून पैशांसाठी विद्यार्थी मित्राचीच हत्या करण्याइतपत मजल मुलांची होवू लागली आहे. त्याचा बळी राज ठाकरे हा विद्यार्थी ठरला आहे. थंड डोक्याने त्याची करण्यात आलेली हत्या मनाला सुन्न करणारी ठरलीे. दहा तासातच पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करून दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. केवळ अल्पवयीन आणि विद्यार्थी असल्युळे त्या दोघांची न्याय देवतेने जामिन मंजूर केला आहे. हा कायद्याचा भाग असला तरी याबाबत समाजात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांची ही घटना ताजी असतांनाच 12 जुलै रोजी श्रॉफ हायस्कुलचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी बेपत्ता झाल्याचे समोर आले. त्यामुळे पालकांमध्ये घबराट होणे साहजीकच आहे.

या विद्यार्थ्यांच्या वडीलांनी पोलिस स्टेशनला धाव घेवून अपहरणाची तक्रार देण्याची तयारी दाखवली. मात्र तेवढ्यात भुसावळ पोलिसांचा त्या पालकाला फोन आला की तुमचा मुलगा भुसावळ येथे आढळला आहे. भुसावळ पोलीसांच्या त्या दूरध्वनीने पलाकांच्या जीवत जीव आला. पण प्रश्‍न पडतो तो विद्यार्थ्यांचा. हा विद्यार्थी नंदूरबार येथून भुसावळात गेलाच कसा? त्याला कुणी सोबत घेवून गेले होते की, तो एकटा गेला होता? हा प्रश्‍न अजूनही अनुत्तरीतच आहे. मागे देखील शहरातील एक विद्यार्थी बेपत्ता झाला होता. तो ठाणे येथे आढळून आला होता. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा झाली. वारंवार विद्यार्थी बेपत्ता होत असल्याचे प्रकरण समोर येत असल्याने सामाजिक प्रश्‍न मिर्नाण होवू पहात आहे. ह्या घटनेच्या मुळाशी जावून त्याचे कारण शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. पाच दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन विद्यार्थींनीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल आहे. या घटनांचा विचार करता पोलीस यंत्रणेने याचा छडा लावावा, अशी मागणी होत आहे.