पुणे : केवळ गुणांवर आधारित आणि पुस्तकी शिक्षणपद्धतीने विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी मोजली जात आहे. गुणांच्या फुगवट्याने विद्यार्थ्यांचे सर्वंकष मूल्यमापन होत नाही. त्यामुळे दहावीत शंभर टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यालाही महाविद्यालयीन स्तरावर नापास होण्याची वेळ येते. शिवाय, नोकरीच्या ठिकाणी त्याला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच केंद्रस्थानी असला पाहिजे, असा सूर तज्ज्ञांनी चर्चासत्रात काढला.
डीपर, सर फाउंडेशन व तुम्ही-आम्ही पालक मासिकाच्या वर्धापदिनानिमित्त जेपी नाईक प्रशिक्षण केंद्रात आयोजित दहावीच्या गुणांच्या फुगवट्याचे दुष्परिणाम, निर्माण झालेल्या समस्या आणि त्यावरील उपाय या विषयावरील चर्चासत्रात लातूर पॅटर्नचे जनक प्राचार्य अनिरुद्ध जाधव, ज्येष्ठ करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत, प्रा. प्रकाश मूळबागल, शिक्षणमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी प्राची साठे, जडणघडण मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे, लेखक व पालक समुपदेशक मनोज अंबिके, सिस्कॉमचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर सहभागी झाले होते. सर फाउंडेशनचे अध्यक्ष हरीश बुटले यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.