जळगाव- कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रीकपध्दतीने हजेरी अनिवार्य करण्याचा निर्णय घेत संबंधित मशिन बसविण्याबाबत महिनाभराची मुदत देण्यात आली होती़ त्यामुळे मशिन बसविण्यात येऊन हजेरीला सुरूवात झाली का नाही? याची तपासणी करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे तीन सदस्यांची कमिटी स्थापन करण्यात आली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रीकपद्धतीने हजेरी अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने जुन महिन्यात घेतला होता़ सोबतच महिनाभरात महाविद्यालयांनी स्व:खर्चाने बायोमेट्रीक मशिन बसवून हजेरीला सुरू करण्याबाबत सुचना केली होती़ दरम्यान, या निर्णयाला अडीच महिने उलटून सुध्दा जिल्ह्यातील फक्त २५ टक्के कनिष्ठ महाविद्यालयांनी बायोमेट्रीक हजेरीसाठी मशिन बसविली आहे़ हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील सर्वच विज्ञान शाखा असलेल्या महाविद्यालयांना शासनाचे आदेशाचे पालन करून बायोमेट्रकी पध्दतीने हजेरी घेण्यात यावी, अन्यथा महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात येईल,असे पत्रक देण्यात आले.