यवत । एसटी बस वेळेवर येत नसल्याने शाळा-महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. तर अनेक एसटीच्या बस महामार्गावर थांबत नसल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. एसटीच्या या सेवेला त्रासलेल्या दौंड तालुक्यातील यवत परिसरातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी बस रोको आंदोलन केले. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी बस रोखून धरल्या होत्या. या आंदोलनात विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दौंड एसटी डेपोचे आगार प्रमुख पी. बी. शेलार यांनी आंदोलनस्थळी येत विद्यार्थ्यांना आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
वरवंड येथील एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालयात यवत आणि आदी परिसरातील 300 ते 400 पासधारक विद्यार्थी रोज सकाळी जातात. परंतु महामार्गावरून जाणार्या सर्वच एसटी बस यवत व आदी ठिकाणी न थांबता भरधाव वेगाने निघून जातात. यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांना विद्यालयामध्ये जाण्यास उशीर होत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. येथील विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार गेल्या महिन्यात दौंड डेपोने एसटी बस सुरू केली होती. परंतु ही सुरू झालेली बस दोनच दिवसात बंद झाली. विद्यार्थ्यांनी रोजच्याच त्रासाला कंटाळून 7 ऑक्टोबरला ही बस रोको आंदोलन केले होते. तरीही कोणतीही सुधारणा न झाल्याने शुक्रवारी पुन्हा एसटी बस रोको आंदोलन करण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करणार!
विद्यार्थ्यांनी महामार्गावरील दोन्ही लेनच्या जवळपास लांब पल्ल्याच्या 25 ते 30 एसटी बस रोखून धरल्या होत्या. यावेळी विद्यार्थांनी एसटी बसच्या बेजबाबदार अधिकार्यांच्या कारभाराबद्दल अधिकारी यांना धारेवर धरीत संताप व्यक्त केला. यावेळी एसटी बसने प्रवास करणार्या प्रवाशांचा खोळंबा झाल्यामुळे बसमधील प्रवाशांनीही महामार्ग रोखत आंदोलन केले. यावेळी दौंड एसटी डेपोचे आगार प्रमुख पी. बी. शेलार यांनी विद्यार्थ्यांसाठी एसटी बस सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जवळपास तीन तास सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी तहसीलदार बालाजी सोमवंशी, पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, भिमा पाटसचे संचालक सुरेश शेळके तानाजी दिवेकर, नाथदेव दोरगे, समीर सय्यद, समीर दोरगे, इम्रान तांबोळी, मयूर दोरगे, लुंबाराम चौधरी यांच्यासह आदी ग्रामस्थ व मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थीनी या आंदोलनात सहभागी झाले होते.