विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे -कुलगुरू

0

पालघर । मुंबई विद्यापीठ हे आपणा सर्वांचे एक मोठे कुटुंब आहे. या कुटुंबात निर्माण झालेल्या अडी अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाशी संबंधित सर्व घाटकांनी आपापली जबाबदारी योग्य रीतीने पेलून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असायला हवे असे आवाहन मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी जिल्ह्यातील प्राध्यापकांना केले. मुंबई विद्यापीठाचा परीक्षा व मूल्यमापन विभाग आणि पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व परीक्षा विभागप्रमुख यांचे ऑनलाईन स्क्रीन मूल्यमापन पद्धतीची प्रशिक्षण शिबीर सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. ह्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते केलेे. यावेळी मार्गदर्शनावेळी त्यानी वरील आवाहन केले.

निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश आले होते अडचणीत
ऑनलाइन स्क्रीन मूल्यमापन पध्दतीने निकाल लावण्यात मुंबई विद्यापीठाला आलेल्या अपयशामुळे विद्यापीठाची चांगलीच नाचक्की झाली आहे. अनेक अभ्यासक्रमांचे निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत आले होते. याविरोधात विद्यार्थी संघटनांनी आंदोलनेदेखील केली. निकालाच्या प्रश्नावर अखेर तत्कालीन कुलगुरुंना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे प्रभारी कुलगुरू शिंदेंनी ऑनलाइन स्क्रीन मूल्यमापन पध्दतीसंदर्भात प्राचार्य व परीक्षा विभागप्रमुखांचे प्रशिक्षणावर भर दिला असून त्याचाच भाग म्हणून पालघरमध्ये हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. विद्यापीठाशी संबंधित सर्वच घटकांनी असलेली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पुढील काळात आपल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याकरिता आपणा सर्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील. असे यावेळी प्रभारी कुलगुरू शिंदेंनी मार्गदर्शन करताना सांगितले.

बोधचिन्हाचे अनावरण
पालघर येथील सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे अनावरण प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ड. जी. डी. तिवारी, उपाध्यक्ष चंद्रकांत दांडेकर, सचिव अशोक ठाकूर, कोषाध्यक्ष हितेंद्र शहा, विश्वस्त आर. एम. पाटील, प्राचार्य किरण सावे आदी उपस्थित होते.