विद्यार्थ्यांना जीवन जगत असतांना सकारात्मक विचार ठेवा -प्रा.डॉ यशपाल कदम

0

सेंट जोसेफ व पोदार इंटरनॅशनल शाळेत ‘आय.एम.पॉझीटीव्ह’ विषयावर कार्यशाळा

चाळीसगाव- जीवनात अनेक चढ-उतार येत असतात तसेच परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थ्यांनो नाराज न होता पुन्हा प्रयत्न करा या जगात अनेक अपयशी झालेल्या मुलांनी कर्तृत्व गाजविलेले आहे व इतिहास रचला आहे. मनात निराशा आल्यावर घरात एका कोपर्‍यात शांत बसा, स्वत:च्या मनाशी विचार करा , मन घट्ट करून नकारात्मक विचार काढून टाका, हे जग सुंदर आहे, सकारात्मक वागून पालक-शिक्षकांना थँक्यू म्हणायला शिका जगण्याची कला आत्मसात करा, असा मोलाचा सल्ला राज्यातील आघाडीचे प्रेरणादायी वक्ते प्रा.डॉ. यशपाल कदम (औरंगाबाद) यांनी आज येथे दिला. चाळीसगांवात नव्याने स्थापन झालेला विविध संस्था पदाधिकारी यांचा आय.एम.पॉझीटीव्ह अर्थात आम्ही चाळीसगांवकर या संस्थेच्या वतीने बुधवारी सकाळी 10.30 वाजता बिलाखेड येथील सेंट जोसेफ या शाळेत तर दुपारी 12.30 वाजता काडी कारखाना परीसरातील पोदार इंटरनॅशनल शाळेत या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेंट जोसेफच्या प्राचार्या सिस्टर लिजी व पोदार इंटरनॅशनलच्या प्राचार्या लता उपाध्याय उपस्थित होत्या.

मित्रांनो कुटुंबाला तुमची गरज
प्रा.डॉ.यशपाल कदम पुढे म्हणाले की, आपणच आपले मित्र आहोत. आपल्या मनाला चांगल्या गोष्टी, चांगल्या विचारांची, व्यायामाची सवय लावा या सवयीतून नकारात्मक विचार आपल्या मनाला शिवणार नाही. ज्या विषयात कमी गुण मिळतात त्याच्यावर अधिक लक्ष द्या, तो विषय उत्तीर्ण होणे सोपे जाते उगाचच नकारात्मक विचार करून आपले मन दु:खी करण्यापासून विद्यार्थ्यांनी दूर रहावे. आपल्या अडीअडचणी आपले पालक, शिक्षक, मित्र यांचेशी खुल्या दिलाने व्यक्त करा त्यातून नक्कीच मार्ग सापडेल, तुम्ही उद्याचे आदर्श भारतीय असून तुमची समाजाला व कुटुंबाला गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

यांची होती उपस्थिती
व्याख्यानास उमंग समाजशिल्पी परीवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील, युगंधरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्मिता बच्छाव, आयएमएचे माजी अध्यक्षा डॉ.उज्वला देवरे, मुख्य समनव्यक सचिन पवार ,सोनल साळुंखे, दिपाली राणा, डॉ.सुवर्णा पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप घोरपडे, जनशक्तीचे उपसंपादक अर्जुन परदेशी, अजय जोशी, शरद पाटील, छाया पाटील, आशुतोष खैरनार, देवेन पाटील, ज्योती राजपूत, दीपाली राणा, योगेश पाटील सुजीत पाटील, गजानन मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ध्यानधारणेनेे मुले झाली प्रफुल्लित
ज्यावेळी एखाद्या विषयासंदर्भात आपल्या मनात राग येतो त्यातून नैराश्य येते त्यातून मुले मुली टोकाचे पाऊल उचलतात अशावेळी निवांत जागी मांडी घालून बसा ध्यान धारणा करा, नैराश्याची आहुती करा, जीवनातील आनंददायी क्षण अनुभवा आपोआप निराशा पळून जाईल असे प्रा.डॉ.यशपाल कदम यांनी सांगून त्यांनी विद्यार्थ्यांकडून दहा मिनिटे ध्यान धारणा करून घेतली.