यवत । दिवसेंदिवस शहरीकरणाचा वेग वाढत चालल्याने पर्यावरणाचा र्हास होत चालला आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी दौंड तालुक्यातील खुटबाव येथील भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंबा (ता. शाहूवाडी, जि.कोल्हापूर) येथे वनाची साफसफाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की खुटबाव येथील विद्यालयाची भौगोलिक, शैक्षणिक सहल कोल्हापूर येथून आंबाघाट मार्गे रत्नागिरी येथे जात असताना दुपारच्या जेवनासाठी आंबा येथे थांबली होती. या ठिकाणी प्लास्टिक कागद, पत्रावळ्या मोठ्या प्रमाणात दिसून आल्या. यावेळी जेवण झाल्यानंतर प्रियंका चांदगुडे, ऐश्वर्या पायगुडे, साक्षी पवार, साक्षी दोरगे, आरती थोरात, नेहा चव्हाण, कोमल दोरगे, दिक्षा भोसले, वैष्णवी नातू या विद्यार्थ्यांनी परिसराची साफसफाई केली. तसेच जमा झालेला कचरा एका पिशवीत जमा करण्यात आला. कारण मानवी हस्तक्षेपामुळे अगोदरच पर्यावरणाचा र्हास होत असताना आणि याचा प्रत्येक्ष फटका वन्यजीवांना आणि मानवाला होत असताना लोकजजागृती आवश्यक आहे.या भागात अनेक पर्यटक, शैक्षणिक सहली नेहमी येत असतात. प्रत्येकानेच अशी खबरदारी घेतल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असे मत स्थानिकांनी व पर्यावरणप्रेमी नागरिकांनी व्यक्त केले आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत
भैरवनाथ विद्यालय दौंड तालुक्यात वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे. शैक्षणिक सहलीला गेल्यानंतर वनांच्या रक्षणासाठी वनातील कचरा गोळा करण्यात आल्याने या उपक्रमाचे कौतुक भाऊसाहेब ढमढेरे, सूर्यकांत खैरे, राजेंद्र भोसले यांनी केले. या उपक्रमात बाबासाहेब सरतापे, मानसिंग रुपनवर, विनायक कांबळे, संजय पवार, सतिश कदम, हनुमंत थोरात, रजनी थोरात, शितल शेलार, राजेंद्र गाडेकर, भाऊसाहेब थोरात यांनी सहभाग घेतला होता.