एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग, चित्रांच्या माध्यमातून अवयवदान, बेटी बचाओ, बेटी पढाओ, पाणी वाचवा, व्यसनाचे दुष्परिणाम असे समाजप्रबोधनत्पर संदेश
डोंबिवलीतील रघुकुल शैक्षणिक ट्रस्टच्या हॉलमध्ये रंगला चित्रकलेचा रंगारंग अविष्कार सोहळा
डोंबिवलीे । रघुकुल शैक्षणिक ट्रस्ट, डोंबिवली व मीडिया पार्टनर दैनिक जनशक्तिद्वारा आयोजित कल्याण-डोंबिवली आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एक हजाराहून आधिक विद्यार्थ्यांनी चित्राद्वारे सामाजिक संदेश दिल्यामुळे समाजप्रबोधनाचा हेतू सफल झाला. तसेच विविधांगी चित्रांतून अवयवदान, बेटी बचाओ, बेटी पढाओ, पाणी वाचवा, व्यसनाचे दुष्परिणाम असे सकारात्मक संदेश देण्यात आले. या स्पर्धेआधी ज्येष्ठ पत्रकार, कीर्तनकार व प्रवचनकार श्यामसुंदर सोन्नर यांनी गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला, तर दैनिक जनशक्तिचे प्रतिनिधी सुनील इंगळे यांनी दीप प्रज्वलन केले. आजच्या स्पर्धेच्या व गतिमान युगात विद्यार्थ्यांना कलेची जाण निर्माण व्हावी, रंगाचा मनसोक्त आनंद लुटता यावा त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच सामाजिक विषयाची जाण निर्माण व्हावी यासाठी रघुकुल शैक्षणिक ट्रस्ट डोंबिवली व मीडिया पार्टनर दैनिक जनशक्तिद्वारा कल्याण-डोंबिवली आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन डोंबिवली येथील ट्रस्टच्या हॉलमध्ये करण्यात आले होते.
तिसर्या गटांमध्ये प्रथम आलेल्या टिळकनगर विद्यामंदिर येथील समृद्धी शुक्ला हिला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रंगाचे साहित्य व १००० रु रोख देऊन गौरव करण्यात आला. द्वितीय आलेल्या चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या कु श्रेयसी नीलेश दुर्वे हिला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रंगाचे साहित्य व ७०० रु रोख देऊन गौरव करण्यात आला. तृतीय आलेल्या होली एंजल्स स्कूलच्या कु. रुचा राजेश जोशी हिला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रंगाचे साहित्य व ५०० रु रोख देऊन गौरव करण्यात आला. २९ विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व रंगाचे साहित्य देऊन सत्कार करण्यात आला, तर ३ शिक्षकांना कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उर्वरीत सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून विलास ससाने, महाराष्ट्र कलाध्यापक संघ सहकार्यवाह व दिगंबर बंडाळे, ठाणे जिल्हा कलाध्यापक संघ यांनी काम पाहिले.
स्पर्धा सुरू करण्याअगोदर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नर म्हणाले की, विद्यार्थ्यांना जे तुमच्या मनात असते. ते तुम्ही चित्राच्या रूपाने उतरवायला पाहिजे. जसे की कोणी बंगल्यामध्ये राहत असेल, तर त्याला आपल्या बंगल्यासमोरील कुंडीत नुकतेच उमललेले फूल दिसेल, त्याच्यासमोरील हिरवेगार गवत दिसेल, सुंदर अशी फुलांची बाग दिसेल, तर नेमकं त्याच्या उलट एखाद्या गरीब झोपडीत राहणार्यांच्या बाबतीत घडेल. त्याला झोपडीत ठिकठिकाणी पत्र्याला पडलेली भोकं दिसतील, त्यामधून पावसाळ्यात पडणारे थेंब, पूर्ण घर पावसाने भरलेले, अशा प्रकारचे चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभे राहील व तेच चित्र रेखाटले जाईल. असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मनात जे असेल किंवा दिसेल ते चित्र रेखाटले तर ते चित्र उत्तमच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिक्षक सेनेचे कोकण विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
समाजप्रबोधनाचा हेतू सफल!
विद्यार्थ्यांचे वय संस्कारक्षम असते. सामाजिक जीवनाच्या आधारावर संस्कार बिंबवणे व समाजापर्यंत अवयवदान, मुली वाचवा, पाणी वाचवा, व्यसनाचे दुष्परिणाम असे सकारात्मक संदेश विद्यार्थ्यांनी चित्राद्वारे दिल्यामुळे समाज प्रबोधनचा हेतू सफल झाला, असे मत स्पर्धेचे व उपक्रमाचे प्रमुख अमोल पाटील, कलाशिक्षक, के. सी. गांधी विद्यालय यांनी व्यक्त केले.
ही आंतरशालेय स्पर्धा व उपक्रम यशस्वी करण्यासाठी शेखर पाटील, नारायण महाजन, सुवर्णा मॅडम, दीपाली सिनकर, राजश्री राजपूत, प्रकाश सर, देवीदास गवारी, अर्चना मॅडम, आशु मॅडम व मीडिया पार्टनर दैनिक जनशक्ति वितरण विभागाचे अशोक भोगले, मयूर गंभीरराव, किशोर लाड, हेमेंद्र नाईक व अमित माने यांनी प्रयत्न केले. तसेच स्पर्धेत विद्यार्थ्यांची झालेली गर्दी नियंत्रित करण्यासाठी शिक्षक नरेंद्र राणे, सुनील पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.
प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्यांचा रंगाचे साहित्य,सन्मानचिन्ह देऊन सत्कार!
तीन गटांमध्ये झालेल्या चित्रकला स्पर्धेतील पहिल्या गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या रॉयल इंटरनॅशनल स्कूलचा कु. गौरव तोंडवलकर यांचा सन्मानचिन्ह, रंगाचे साहित्य, प्रमाणपत्र व १००० रुपये रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. द्वितीय आलेल्या एसआयए प्रायमरी स्कूलच्या श्रीलेखा प्रमोद बोगा हिला समानचिन्ह, प्रमाणपत्र, रंगाचे साहित्य व ७०० रुपये रोख देऊन सत्कार करण्यात आला. रघुकुल शैक्षणिक ट्रस्टच्या तृतीय आलेल्या कु. सप्तऋषी सरकार याला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रंगाचे साहित्य व ५०० रु रोख देऊन सत्कार करण्यात आला.
मुलींचा सहभाग लक्षणीय!
कल्याण-डोंबिवली येथील दुसरी ते दहावीच्या ५२ शाळेतील सुमारे एक हजारच्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेश या स्पर्धेतून पाहायला मिळाला. विशेष म्हणजे अंबरनाथ व बदलापूर येथील विद्यार्थ्यांनीसुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद या चित्रकला स्पर्धेला देऊन सहभाग नोंदवला. शालेय विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अशी चित्र काढून उपस्थितांचे मने जिंकली.
यांची होती उपस्थिती!
बक्षीस समारंभ सुरू होण्याअगोदर दुसर्या सत्रामध्ये भास्कर तिथे, निरीक्षक, महाराष्ट्र राज्य चित्र व शिल्प, विश्वनाथ राणे नगरसेवक, गुरुदत्त लाड, महाव्यवस्थापक, दैनिक जनशक्ति, विलास ससाने, दिगंबर बंडाळे, रघुकुल शैक्षणिक ट्रस्टचे सी.आर.पाटकर, साईकृपा सहकारी पतपेढीचे अध्यक्ष जितेंद्र राणे, स्पर्धा व उपक्रमप्रमुख अमोल पाटील यांनी दीप प्रज्वलन केल्यानंतर योगिनी काळे या विद्यार्थिनीने नृत्यकला सादर केली. त्याला हॉलमध्ये उपस्थितांनी दाद देवून तिचे कौतुक केले.
माझे स्वप्न सत्यात उतरले!
रघुकुल शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष सी.आर.पाटकर यांनी सांगितले की माझे स्वप्न आज सत्यात उतरताना बघून मनाला फार बरे वाटले. २० वर्षांपूर्वी मी एक रोपटे लावले होते. त्याचा एक मोठा वृक्ष मला बघायला मिळाला यातच मी धन्य झालो, तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित सांगितले की, आज यामधील काही विद्यार्थी जागतिक कीर्तीचे कलाकार घडतील. यात काही एक संदेह नाही, कुठलीही गोष्ट सहजासहजी साध्य होत नसते. कोणतीही कला जोपासायची असेल, तर मेहनत ही करावीच लागते, तर साईकृपा सह पतपेढीचे अध्यक्ष जितेंद्र राणे यांनी हे काम सामाजिक बांधिलकी जपून करत असल्याचे व समाजप्रबोधन करत असल्याचे म्हणाले.
विजेत्याचा सन्मानचिन्हे देऊन गौरव!
दुसर्या गटामध्ये चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या एस. के. पाटील विद्यालयाच्या कु. यशोधन विचारे यांला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रंगाचे साहित्य व १००० रुपये रोख देऊन गौरवण्यात आले. द्वितीय आलेल्या के. सी. गांधी विद्यालय कल्याणच्या कु. यशस्वी सोनवणे हिला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रंगाचे साहित्य व ७०० रु रोख देऊन गौरवण्यात आले, तृतीय आलेल्या एस.आय.ए. हायस्कूलच्या अथर्व जे. राणे यांला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रंगाचे साहित्य व ५०० रु रोख देऊन गौरवण्यात आल्याची माहिती यावेळी आयोजकांच्यावतीने देण्यात आली.