सुदवाडी गावात विविध सामाजिक उपक्रम
तळेगाव स्टेशन । सिध्दांत अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सुदुंबरे) राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांचे शिबीर सुदवडी येथे संपन्न झाले. या कालावधीत त्यांनी स्वच्छता व प्लास्टिक हटावच्या जनजागृतीबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबविले. सरपंच सदानंद टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली व सिध्दांत संस्थेचे कार्यकारी संचालक जी. एम. देशमुख यांच्या हस्ते या शिबीराचे उदघाटन झाले. तंत्रनिकेतनचे प्राचार्य एस. एस. देव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. यु. एम. शिरसाट यावेळी उपस्थित होते.
गावात स्वच्छता अभियान
या कालावधीत विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवून गावातील रस्ते, परिसर व सुधा नदीचा घाट स्वच्छ केला. तसेच स्वच्छतेचे महत्त्व व प्लास्टिकचे दुष्परिणाम याबाबत ग्रामस्थांना सविस्तर माहिती दिली. स्वच्छता राखा-आरोग्य राखा तसेच प्लास्टिक हटाओ-देश बचाओ या घोषणा देत गावातून जनजागृती रॅली काढली आहे. गावातील युवकही या स्वच्छता अभियान व जनजागृती फेरीत सहभागी झाले होते.
संस्कार व ध्येयपूर्तीवर मार्गदर्शन
पिंपरी चिंचवड ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. सुमारे 55 जणांनी रक्तदान केले. स्वामी विवेकानंद व आजचे युवक या विषयावर प्रा. महादेव वाघमारे यांनी व्याख्यान दिले. तसेच प्रा. विजय नवले यांनी विद्यार्थी-संस्कार व ध्येयपूर्ती याविषयी मार्गदर्शन केले. एनडीआर एफच्या जवानांनी आकस्मिक येणार्या आपत्तीस सामोरे कसे जावे व त्याचे निवारण कसे करावे याविषयावर कार्यशाळा घेऊन ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण जवान राम गुर्जर व सहाय्यक निरीक्षक मनोजकुमार यांनी दिले. राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे संयोजन समन्वयक प्रा. वसंत हसरे, अश्विनी बढे, निशा पवार, परवेश राही, संजय कसबे व कामेश सोनवणे यांनी केले.