समारोप कार्यक्रमात व्यक्त केले मत
निगडी : आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये ज्ञान प्रबोधिनीने आयोजित केलेल्या संगीत संमेलनासारख्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे अनुकरण व्हायला हवे. दोन दिवसांच्या संमेलनातून तुम्ही संगीत विषयाकडे वळला नाही तरी चालेल. पण या श्रेष्ठ कलाकारांच्या जीवनपटाचा अभ्यास जरुर करा. कारण त्यातून उत्तम व्यक्ती घडण्यासाठी काय-काय सोसावे लागते, याचे भान येईल. त्यातून तुमच्याही व्यक्तिमत्वाला आकार मिळेल. तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले व्हाल. आपल्या भारतीय संगीताचा वारसा माहिती करुन घेऊन त्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करा, असे मत सांगता समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सागर देशपांडे यांनी व्यक्त केले.
ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात दोन दिवसीय संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संगीत संमेलनाची सांगता गुरुवारी उत्साहात झाली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. संमेलनामध्ये संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कलाकारांनी दोन दिवस विविध सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपुढे संगीतविश्व उलगडून दाखविले. यावेळी संमेलन अध्यक्ष पं. रामदास पळसुले, उपाध्यक्ष समीर दुबळे, डॉ. विकास कशाळकर, ज्ञानप्रबोधिनीच्या निगडी केंद्राचे उपप्रमुख मनोज देवळेकर, मुख्याध्यापिका प्रज्ञा पाटील, अलका शाळू, नचिकेत देव, यशवंतराव लिमये, शीतल कापशीकर, किशोर जाधव आदी उपस्थित होते.
‘संगीत रत्नाकर’चा सन्मान
संमेलनाचा आढावा घेताना संमेलनाचे उपाध्यक्ष समीर दुबळे म्हणाले, संगीत हा विषय अभ्यास म्हणून निवडला हेच कौतुकास्पद आहे. संगीत दिंडीच्या माध्यमातून ‘संगीत रत्नाकर’ हा ग्रंथ पालखीत मिरवण्याचा संगीत इतिहासातील पहिलाच क्षण असावा. वाद्य परिचयातून वेगवेगळ्या स्वरुपात नवीन माहितीचे दालन खुले झाले. कार्यशाळांमधून त्या-त्या विषयाची तोंडओळख झाली. या सगळ्यातून संगीत विषयात विशेष अभ्यास करायचे ठरवले तर संमेलन यशस्वी झाले असे आनंदाने म्हणता येईल
पं. पळसुले यांचे सोलो वादन
संगीत संमेलनाची सांगता संगीत सभेने झाली. यावेळी नचिकेत देव यांचे गायन झाले. त्यांनी मधूवंती राग सादर केला. त्यांना संवादिनीवर उमेश पुरोहित तर तबल्यावर विवेक भालेराव यांनी साथ संगत केली. यानंतर संमेलनाध्यक्ष पं. रामदास पळसुले यांचे सोलो तबला वादन झाले. त्यांनी त्रिताला मधले पेशकर, कायदे, रेले, चक्रदार, तुकडे, मुखडे, गती सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांना संवादिनीवर नगमा साथसंगत राजीव तांबे यांनी केली. त्यानंतर नचिकेत देव यांच्या भैरवी मधील प्रार्थनेने सभेची सांगता झाली.
उत्तुंग कामगिरीची प्रेरणा
समारोप करताना केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर यांनी मुलांना या दोन दिवसांच्या सांगीतिक मेजवानीचा लाभ घेऊन या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करण्याची प्रेरणा घ्या, असे सुचवून सर्वांचे आभार मानले. संगीत संमेलनाच्या यशस्वीतेसाठी इंडो स्कॉटल, बिजनेस सोल्यूशन, अनुप मोरे, अमित गावडे, निलेश शिंदे आदींनी परिश्रम घेतले. सांगता समारंभाचे सूत्रसंचालन मधुरा लुंकड यांनी केले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचा समारोप कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. अलका शाळू, प्रतिभा पतके, उमेश पुरोहित, नचिकेत देव, शीतल कापशीकर, विद्यालयाचे केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर, संमेलनाचे अध्यक्ष रामदास पळसुले, उपाध्यक्ष समीर दुबळे, विकास कशाळकर यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.