विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला

0

जुन्नर : जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कुल मधील 10 ते 15 विद्यार्थी गुरुवारी सकाळची शाळा सुटल्यानंतर शाळेच्या पटांगणात खेळत असताना अचानक आग्या मोहोळाच्या माश्यांनी हल्ला केल्याने हे विद्यार्थी जखमी झाले.या घटनेतील हे विद्यार्थी बाहेरगावी राहणारे असून शाळा सुटल्यानंतर घरी जाण्याकरिता गाडीची वाट पाहत असताना नगरपरिषद पाणीपुरवठा टाकीवरील असणार्‍या आग्या मोहोळच्या या मुलांवर हल्ला केला.

विद्यार्थ्यांवर उपचार
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे हे विद्यार्थी मोठमोठ्याने आरडाओरडा करीत इकडे तिकडे पळत होते. यातील काही विद्यार्थी घरी जाण्याकरिता उभ्या असलेल्या गाडीत जाऊन बसले असता तेथेही माशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आर्या नायकोडी, स्वरा पानसरे, श्रेया नेहरकर, अनुष्का काशीद, अवधूत वर्पे, गुरुनाथ ढोले, सत्यम चव्हाण या विद्यार्थ्यांना माशांनी जास्त चावे घेतल्याने ते जास्त जखमी झाले. त्यांच्यावर जुन्नर ग्रामीण रुग्णालय, डॉक्टर इंगवले दवाखान्यात उपचार करण्यात आले .

अचानक हल्यामुंळे गोंधळ
दरम्यान शाळे जवळ पाणीपुरवठा विभागाच्या दोन उंच टाक्या असून या टाक्याच्या वरच्या बाजूस लहान-मोठी अनेक आग्या मोहोळ आहेत. काही महिन्यांपूर्वी ही आग्या मोहळे नगर परिषदेने काढून टाकलेली होती परंतु काही दिवसातच या जागेवर ती पुन्हा तयार झाली. यामधील एका आग्या मोहळातील माशांनी गुरुवारी सकाळी अचानक शालेय विद्यार्थ्यांवर हल्ला केल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. यावेळी हा प्रकार घडलेला असताना शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयातील शिक्षक सदानंद उकीर्डे, शाळेतील शिपाई अंकुश लोखंडे दिनेश गायकवाड राजेंद्र रोकडे यांनी मोठी धावपळ करून या मुलांना माशांच्या चाव्यापासून वाचविण्यात मोठी मदत केली .