विद्यावेतनाचा मार्ग मोकळा

0

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची विद्यापीठाकडून दखल

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच.डी. करणार्‍या विद्यार्थ्यांना आता गुणवत्तेनुसारच विद्यावेतन (स्टायपेंड) देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. विद्यावेतनासाठी विद्यापीठाने समितीची नेमणूक केली आहे. समितीकडून अहवाल आल्यानंतर विद्यावेतनाची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.

विद्यापीठाकडून एम.फिल. आणि पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात येते. काही महिन्यांपूर्वी विद्यावेतन मिळत नसल्याने आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनानंतर विद्यावेतन सुरू करण्यात आले. मात्र, शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळत नसल्याने त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर, विद्यावेतनाच्या योजनेची पुनर्रचना करण्यात येत असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

समिती स्थापणार

गेल्या काही वर्षांत एम.फिल. अभ्यासक्रमाचे महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला फारसे प्रवेशही होत नाहीत. त्यामुळे या बाबतही पुनर्विचार करावा लागणार आहे. अनेक वर्षे सुरू असलेला अभ्यासक्रम अचानक बंद करण्याऐवजी काही वेगळा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यासाठीही वेगळी समिती काम करीत असल्याचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.

गुणवत्तेवर आधारित मिळणार विद्यावेतन

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) देण्यात येणारा निधी बंद झाला. त्यानंतर विद्यापीठाने स्वायत्ता निधीतून विद्यावेतन दिले. मात्र, सरसकट विद्यावेतन देण्यापेक्षा गुणवत्तेवर आधारित विद्यावेतन देण्याचा प्रयत्न आहे. कारण, सरसकट विद्यावेतन देण्यातून काहीच साध्य होत नाही. त्यापेक्षा गुणवत्तापूर्ण संशोधन होण्यासाठी ते गुणवत्तेवर आधारित असणे अधिक योग्य ठरेल. त्या दृष्टीने समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर विद्यावेतनाच्या योजनेची पुनर्रचना करण्यात येईल. हे विद्यावेतन विषयनिहाय असेल, असे डॉ. करमळकर यांनी स्पष्ट केले.