जळगाव:नशिराबाद येथे महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु आहे, या अंतर्गत महापारेषण कंपनीकडून अतिउच्चदाब वाहिनीच्या मनोऱ्यांचे स्थलांतरही केले जाणार आहे. मात्र या स्थलांतरांची प्रक्रिया ही शासकीय अादेशानुसार राबविण्यात यावी अशी मागणी जिल्हापरिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील व नशिराबाद येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडे केली आहे.
महामार्गा क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. नशिराबाद – बोदवड रस्ता बांधकाम करण्यासाठी उड्डाणपुलाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी त्या उड्डाणपुलाला ही अतिउच्चदाब वाहिनी ही क्रॉस होत आहे. यामुळे ही वाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम सुरु आहे. मात्र हे काम करतांना कंत्राटदाराने शासन निर्णयातील कोणत्याही नियम व अटींचे पालन केले नाही. यामुळे या कामासाठी समिती स्थापन करून अतिउच्चदाब मनोऱ्या व्यापक व वाहिनीच्या तारेखालील जमिनीची मोजणी करून प्रस्तावाप्रमाणे मूल्यांकन करून मोबदला निश्चित करावा अशी मागणीही निवेदनात केली आहे. यासंबधीची निवेदन उर्जामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आले आहे.