कवी लक्ष्मीकांत तांबोळी : महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये ‘एक कवी एक कवयित्री’ कार्यक्रम
पुणे : मराठी कवितेतला विद्रोह खूप मोलाचा आहे. विद्रोह हा जाती आणि व्यक्तिकेंद्रित नसावा. व्यवस्थेच्या विरोधात झालेला विद्रोह परिवर्तन घडवितो. विद्रोही कवितेमुळेच मराठी कवितेचा प्रवाह समृद्ध झाला असे मत कवी प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘एक कवी एक कवयित्री’ या कार्यक्रमात प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी व डॉ. अश्विनी धोंगडे यांची मुलाखत उद्धव कानडे व प्रमोद आडकर यांनी घेतली. यावेळी प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे उपस्थित होते.
पुरुषांच्या विरोधात लेखन नाही
डॉ. धोंगडे म्हणाल्या, महिलांवर होणार्या अन्यायाने मी अस्वस्थ व्हायची. माणसांचे अनेक प्रकार अनुभवले. स्त्रीवाद म्हणजे पुरुषांच्या विरोधात लेखन नसते तर ते व्यवस्थेच्या विरोधात असते. माणसासारखं जगणं ही प्रत्येक स्त्रीच्या मनातील भूक आहे. बाईलाच मर्यादा का? तिच्यातील क्षमता स्त्री सिद्ध करून दाखवते. मर्यादा ओलांडताना स्त्रीवर अन्याय का?
हा कवितेचा अपमान आहे
मराठी कवितेपेक्षा इतर भारतीय कवितेत स्त्रीवाद समर्थपणे आला आहे. कवीने रांगा लावून कविता वाचन करणे ही सवय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने लावली. या रांगा पाहून वेदना होतात हा कवितेचा अपमान आहे. कविकट्टा म्हणजे बायोडाटा वाढविणे आहे. हे बंद व्हायला हवे. कविता ही तळहातावरचा निखारा असते. धोंगडे यांनी ‘बरे झाले देवा’,‘बाई डॉट कॉम’, ‘पणजी’ आणि ‘मी पाण्याच्या जातीची’ या कविता सादर केल्या. प्रा. तांबोळी म्हणाले, कविता हे न पेलणारे शिवधनुष्य आहे. कवीला वय असते कवितेला नसते. कोणतीही कविता लहान किंवा महान नसते. जगणं आणि मरणे यातील वाट कविता असते. कवितेसाठी आयुष्य गहाण ठेवावे लागते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची वाईट स्वप्ने मला पडत नाहीत.
कविता शिकविण्याइतकं पातक नाही
ज्यांनी बोरकर, करंदीकर, इंदिरा संत यांच्या स्वप्नांचा चुराडा केला त्यांची स्वप्ने कशाला पहावीत. अध्यक्ष व्हावं असे कधीच वाटलं नाही. वर्गात कविता शिकविण्याइतकं मोठं पातक दुसरं नाही. कवितेकडे प्रेयसी म्हणूनच पाहत आलो आहे. चुकीच्या पद्धतीने कविता म्हटल्यामुळे कवी संमेलनं बदनाम झाली. पसरटपणा कवितेला मारक असतो. कवितेत गांभीर्य असलेच पाहिजे. तांबोळी यांनी, शब्द देणे, पणतू, बिजवृक्ष, दयाळा या कवितांचे वाचन केले. प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले, प्रकाश पायगुडे यांनी स्वागत केले. प्रमोद आडकर यांनी आभार मानले तर उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.