विधानमंडळ अंदाज समितीकडून पालिका प्रशासनाची झाडाझडती!

0

पिंपरी-चिंचवड: विधानमंडळ अंदाज समितीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा, वैद्यकीय, नगररचना, लेखा, लेखापरिक्षण अशा विविध विभागाचा आढावा घेतला. विभागाच्या कामकाजातील त्रुटीवरुन पालिका प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. कामात सुधारणा करण्याच्या कडक शब्दात सूचना केल्या. संबंधित विभागप्रमुखांकडून खुलासा मागविण्यात आला. तसेच समितीच्या सदस्यांनी पालिकेच्या वायसीएमएच् रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयातील सोयी-सुविधांची माहिती घेतली.
पालिकेच्या महापौर मधुकर पवळे सभागृहात गुरुवारी आढावा बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विधानमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अनिल कदम होते. या समितीत आमदार उन्मेश पाटील, कृष्णा खोपडे, विजय रहांगडाले, राजेश काशीवार, बाळासाहेब मुरकुटे, कृष्णा गजभे, प्रकाश आबीटकर, डॉ. संजय रायमुलकर, विजय वडेट्टीवार होते.

पाणीपुरवठा अधिकारी फैलावर
समितीच्या सदस्यांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना फैलावर घेतले. शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळजोड आहे. त्यावर कारवाई का केली जात नाही. पवना धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचा प्रकल्प रखडला आहे. जागा ताब्यात नसताना कामाची निविदा का? काढली गेली. पाण्याचे पाईप जागेवर सडून गेले आहेत. तो विषय वेळेत मार्गी लावा, अशा सूचना केल्या. बीआरटीएस प्रकल्प किती सुरु झाले आहेत. किती प्रकल्प रखडले आहेत. याची देखील माहिती घेतली. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला विलंब का होत आहे. प्रक्रियायुक्त पाणी नदीत सोडल्यामुळे नदी प्रदुषित होत आहे. त्याची जबाबदारी कोणाची? सांडपाणी नदीत सोडू नका, अशा सूचना केल्या.

टीडीआरच्या किती जागा घेतल्या
शहरातील कचर्‍याची योग्यपद्धतीने विल्हेवाट लावली जाते का?, कचर्‍यापासून इंधन निर्माण करण्याचा प्रकल्प चालू आहे का?, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचा डीपीआर का तयार केला नाही. शहराचा विकास आराखडा का तयार केला गेला नाही. पालिकेडे निधी असताना देखील कामाचे नियोजन का होत नाही. टीडीआरचे धोरण कसे आहे. किती जागा ताब्यात घेतल्या आहेत. टीडीआर वाटपाच्या समितीत केवळ प्रशासकीय अधिकारीच असून राजकीय पदाधिकारी नाहीत का,अशी विचारणा केली.

लेखाप्रमुख निष्क्रीय असल्याचा शेरा
समितीच्या सदस्यांनी विकासनिधी किती खर्च झाला. बजेट ओपन करता तर रक्कम खर्ची का पडली नाही, असे प्रश्‍न विचारले. पंरतु, संबंधित अधिका-यांना त्याची आकेडवारी देता आली नाही. प्रशासनाने लेखाप्रमुख ’फिलिपिन्स’ दौर्‍यावर गेले असल्याचे सांगितले. त्यावर समितीच्या सदस्यांनी लेखाप्रमुख निष्क्रीय असल्याचे सांगत त्यांची तशी नोंद करण्याची सूचना केली. लेखापरिक्षणाची आकडेवारी मागितली. लेखा परिक्षणाबाबत एक लाखाहून अधिक तक्रारी होत्या. त्यापैकी किती तक्रांरीचे निराकरण केले. किती जणांवर कारवाई केली, असेही विविध प्रश्‍न समितीच्या सदस्यांनी विचारले.

आरोग्य विभागाकडून मागितला खुलासा
नदीसुधार प्रकल्प त्वरित राबविण्याच्या सूचना पालिका प्रशासनाल्या दिल्या आहेत. वायसीएमएच रुग्णालयाच्या स्वच्छतेचे काम दोन वर्षांसाठी कसे दिले गेले. स्वच्छतेचे काम देताना ’प्री-बीड’ मिटींग का घेतली गेली नाही?, रुग्णालयात कॉर्डिओलॉजिस्ट का भरले नाहीत, असे विविध प्रश्‍व विचारुन प्रशासनाला फैलावर घेतले. तसेच समितीच्या सदस्यांनी संबंधित विभागांकडून खुलासा मागविला आहे.