विधान परिषदेचे कामकाज फक्त तीन मिनिटांत तहकूब

0

मुंबई : अर्थसंकल्प मांडण्यात येत असताना सभागृहात व त्यानंतर सभागृहाबाहेर गोंधळ घालून अप्रतिष्ठेचे वर्तन केल्याच्या आरोपावरून निलंबित केलेल्या १९ विधानसभा सदस्यांच्या विषयाची कर्जमाफीच्या मागणीला विरोधकांनी जोड दिल्यानंतर अवघ्या

तीन मिनिटांमध्ये विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले. कर्जमाफीच्या मुद्द्यावर मागचे ११ दिवस राज्य विधान परिषदेचे कामकाज विरोधकांनी रोखून धरले आहे. कर्जमाफीच्या मुद्यामध्ये आता विधानसभेच्या १९ सदस्यांना निलंबित केलेल्या मुद्द्याची जोड मिळाली आहे. सभागृहाची बैठक दुपारी बारा वाजता सुरू झाली. उपसभापती माणिकराव ठाकरे त्यांच्या आसनाजवळ येताच विरोधी बाकावरील सदस्य सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत आले व घोषणा देऊ लागले. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, विधानसभेच्या निलंबित सदस्यांचे निलंबन मागे घ्या, अशा त्यांच्या घोषणा होत्या. या घोषणा सुरू असतानाच उपसभापती ठाकरे यांनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची घोषणा केली.