मुंबई-विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड, नाशिक, अमरावती, परभणी-हिंगोली, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली आणि लातूर-बीड-उस्मानाबाद या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात २१ मे रोजी मतदान झाले होते. आज याची मतमोजणी झाली. ६ पैकी ५ जागांचे निकाल लागले असून यात शिवसेनेला २, भाजपला २ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला केवळ एक जागा मिळाली आहे.
परभणी-हिंगोलीत शिवसेना
परभणी : परभणी-हिंगोली विधान परिषद मतदार संघातून शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले आहे. त्यांनी २५६ मतांनी विजय मिळविला. बाजोरिया यांनी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांचा पराभ केला. त्यांना २२१ मते मिळाली.
अमरावतीत कॉंग्रेसला धक्का
अमरावतीत काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. कारण अमरावतीत काँग्रेसची स्वत:ची १२८ मते असताना काँग्रेस उमेदवाराला केवळ १७ मते मिळाली. त्यामुळे भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी ४५८ मते मिळवत मोठा विजय मिळवला.
नाशकात शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी
दुसरीकडे नाशिकमध्ये शिवसेनेने बाजी मारली. पालघरचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या भाजपला हा मोठा दणका आहे. कारण सेनेच्या नरेंद्र दराडे यांनी जवळपास २०० मतांनी विजय मिळवला.
सुनील तटकरे यांचे पुत्र विजयी
रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळे यांचा पराभव केला.
लातूर-बीड-उस्मानाबादची मतमोजणी कोर्ट केसमुळे लांबणीवर
लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदारसंघाचा निकाल हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राखून ठेवला आहे. त्यामुळे या जागेची मतमोजणी लांबणीवर पडली आहे. विधानपरिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर जागेसंदर्भात अचानक झालेल्या कोर्ट केसमुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्र पाठवूनच मतमोजणी उद्या होणार नसल्याचे कळवले आहे. विशेष म्हणजे, या जागेची मतमोजणी उद्या नाही, मग नेमकी कधी होईल, याबाबत काहीही माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्रात दिलेली नाही. त्यामुळे संभ्रम कायम राहिला आहे.