मुंबई : विधान परिषदेच्या जुलैमध्ये रिक्त होणाऱ्या ११ जागांमध्ये अनिल परब यांच्या रूपाने शिवसेनेच्या एकाच जागेचा समावेश असला तरी विधानसभेतील संख्याबळानुसार शिवसेनेचे दोन आमदार सहज निवडले जाणार असल्याने दुसऱ्या जागेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय व नुकतीच शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती झालेले मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची चर्चा असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून समजते.
विधान परिषदेतील ११ सदस्यांची मुदत जुलैमध्ये संपत असून त्यात शिवसेनेचे आमदार अनिल परब यांचा समावेश आहे. अनिल परब हे विधान परिषदेतील गटनेते असून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. विधानसभेतील सदस्यांमधून होणाऱ्या या निवडणुकीत एका उमेदवाराला जिंकण्यासाठी २५ मतांचा कोटा असणार आहे. शिवसेनेचे ६३ आमदार असल्याने अनिल परब यांच्याबरोबरच शिवसेनेला आणखी एक आमदार विधान परिषदेत पाठवून तेथील आपले संख्याबळ वाढवण्याची संधी मिळाली आहे. दोन आमदार निवडल्यानंतरही १३ मते शिवसेनेकडे शिल्लक उरणार आहेत.
शिवसेनेच्या या दुसऱ्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. नार्वेकर हे जवळपास २३ वर्षे उद्धव यांचे स्वीय सहायक असून सहा महिन्यांपूर्वी झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत नार्वेकर यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.
याबाबत विचारणा करण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता, कोणाला उमेदवारी द्यायची किंवा कोणाला नाही याचा निर्णय शिवसेनेत फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे हेच करतात. त्यामुळे या विषयावर मी बोलणे योग्य ठरणार नाही, असे उत्तर त्यांनी दिले.